गिर्ये, रामेश्‍वरमध्ये होणार क्रुड ऑईलचा टर्मिनस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

विजयदुर्ग - ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सिंधुदुर्गातील गिर्ये आणि रामेश्‍वर या दोन महसुली गावातील ५१७.६२२ हेक्‍टर खासगी व ४१.१८२ हेक्‍टर सरकारी जमिन संपादित केली जाणार आहे. या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग खाडी याच्यामध्ये असलेल्या या गावात क्रुड ऑईलचा टर्मिनस होणार आहे.

विजयदुर्ग - ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सिंधुदुर्गातील गिर्ये आणि रामेश्‍वर या दोन महसुली गावातील ५१७.६२२ हेक्‍टर खासगी व ४१.१८२ हेक्‍टर सरकारी जमिन संपादित केली जाणार आहे. या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग खाडी याच्यामध्ये असलेल्या या गावात क्रुड ऑईलचा टर्मिनस होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मुख्य भाग याच ठिकाणी असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या प्रकल्पासाठी मुनाफ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन संघर्ष समितीचे सदस्य पदाधिकारी सरजू घाटये यांनी सकाळशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली. ते म्हणाले, ‘‘या भागात बंदर व्हावे आणि जलवाहतुकीला चालना मिळावी, अशी आमची बऱ्याच वर्षांपासून मागणी होती; पण सरकारने याकडे लक्ष दिले नाही. आता नाणार प्रकल्पासाठी आमच्या गावात जेटी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचा जेटीला विरोध नाही; पण त्याचा नाणार प्रकल्पासाठी वापर होता नये. कारण हा प्रकल्प झाला तर आमच्या गावाचे अस्तित्वच राहणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘या प्रकल्पाला आमचा शंभर टक्के विरोध आहे. हा प्रकल्प झाल्यास आमचे अस्तित्वच संपणार आहे. आमचा भाग ओसाड असल्याचा दावा राजकीय नेते आणि धोरणकर्ते करतात. ‘गुगल’वर पाहून त्यांनी सोयीस्कर भाष्य करू नये. येथे ८० टक्के आंबा बागा आहेत. २० टक्के शेत जमिनीचे क्षेत्र आहे. या जमिनीने आमच्या अनेक पिढ्या जगवल्या. हे कोणत्या सरकारच्या जीवावर नाही तर या गावामुळे आणि मेहनतीमुळे शक्‍य झाले आहे. तिचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. यामुळे नाणार प्रकल्पाला आमचा प्राण पणाने विरोध असेल.

आमच्या भागात कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला जाहीर सभा लावूच देणार नाही. आमच्याशी कोणतीच चर्चा न करता ते प्रसार माध्यमांकडे रोजगार देण्याची भाषा करत आहेत. नोकऱ्या कसल्या हेल्परच्याच देणार ना? यात आमचे सर्वस्व हिरावले जाणार आहे. त्यामुळे आमचा विरोध कायमच राहील.
- सरजू घाटये,
संघर्ष समिती

रिफायनरी झाली तर आमच्या दोन्ही गावांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ही लढाई आमच्यासाठी जीवन-मरणाची आहे. दरवर्षी या भूमीतून करोडो रुपयांचे कृषी उत्पन्न मिळते. त्यामुळे या भूमीला वाचविण्यासाठी आमच्या प्राणांची आहुती गेली तरी बेहत्तर अशा तीव्र भावना नाणार प्रकल्पाच्या प्रभावाखाली असलेल्या सिंधुदुर्गातील गिर्ये आणि रामेश्‍वर येथील रहिवाशांच्या आहेत.

सध्या या भागात आंब्याचा हंगाम ऐनभरात आहे. येथील जवळपास ८० टक्के कुटुंब आंब्याशी संबंधित रोजगारावर अवलंबून आहेत. ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या या दोन्ही गावांतून दरवर्षी करोडो रुपयांच्या आंब्याची काढणी होते. यंदाचा आंबा हंगाम या दोन्ही गावांसाठी प्रचंड तणावाखाली आणणारा आहे. कारण एकीकडे नाणारचे रण पेटले आहे. प्रशासनाचे जमीन संपादनाचे लक्ष्य नाणार परिसराकडे असले तरी पुढच्या आंबा हंगामापर्यंत काही पिढ्यांचा पोशिंदा असलेल्या आंब्याच्या बागा शिल्लक असतील का, याची चिंता गिर्ये, रामेश्‍वरमधील रहिवाशांना आहे. प्रकल्पाबाबत त्यांच्या भावना तीव्र आहेत.

 

Web Title: Sindhudurg News crude oil turminus in GIrye, Rameshwar