भुईबावडा घाटात ५६ ठिकाणी डेंजर झोन

एकनाथ पवार
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वैभववाडी - अरूंद रस्ता, त्यातच दरीकडील बाजूचे जीर्ण झालेले संरक्षक कठडे, क्रॅश बॅरियर्सचा नगण्य वापर, जागोजागी खचलेला रस्ता, रस्तापातळीला अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ५६ मोकळ्या जागा, नादुरूस्त रस्ता आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम, अशीच काहीशी स्थिती दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या भुईबावडा घाटरस्त्याची आहे.

खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाट हा करूळ घाटरस्त्याला भक्कम पर्याय मानला जातो. भुईबावडा हा साडेसहा किलोमीटर लांबीचा घाट असून, या घाटरस्त्यालगत सुमारे एक हजार फुट खोल दरी आहे. घाटाची सध्या दुरवस्था झाली आहे. साडेसहा किलोमीटर अंतरापैकी अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याकडेला भयावह अशा दरडी आहेत. रस्त्याकडेला हजारो फूट खोलीची दरी त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याने वाहतूक करताना विशेषतः पावसाळ्यात जीव मुठीत धरूनच करावी लागते.

तब्बल ५६ ठिकाणी दरीकडील बाजूस संरक्षक कठडा किंवा क्रॅश बॅरियर्स नाहीत. त्यापैकी ११ ठिकाणी तर रस्त्याला समांतर व अपघाताला निमंत्रण देणारी अशी अतिशय धोकादायक आहेत. अनेक जुने संरक्षक कठडे कोसळले आहेत. असलेल्या कठड्यांची वाहन रोखण्याची क्षमताच संपली आहे. कठड्यांचे दगडही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. दोन ठिकाणी रस्ता खचला आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून दगडमातीचा भराव टाकला आहे. प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहन चालविणे कठीण होत आहे.

या घाटात फक्त चार ते पाच ठिकाणीच क्रॅश बॅरियर्सचा लावले आहेत. दरडी रोखण्यासाठी या घाटात मोठ्या प्रमाणात बोल्डर नेटचा वापर करण्याची गरज आहे. जीर्ण कठड्याची पुनर्बांधणी आवश्‍यक आहेत. हा रस्ता अरूंद असल्यामुळे दरीच्या बाजूला रस्त्याकडेला रिप्लेक्‍टर आणि पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे.

Web Title: Sindhudurg News Danger zone in Karul, Bhuibavada Ghat