राणेंनी आणलेल्या प्रकल्पांना खीळ - दत्ता सामंत

राणेंनी आणलेल्या प्रकल्पांना खीळ - दत्ता सामंत

कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सत्तेत असलेले खासदार व आमदार या शिवसेना नेत्यांचे अपयश जनतेच्या लक्षात आले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी होऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना या सत्ताधाऱ्यांनी खीळ घातली असून, जिल्हा दहा वर्षे मागे नेला आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या मनातील नाराजी आणि जनतेच्या भावना सरकार दरबारी पोचविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. येत्या ८ डिसेंबरला सकाळी अकराला आम्ही जिल्हाकाऱ्यांची भेट घेऊ, अशी माहिती ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिली. 

मराठा मंडळाच्या येथील सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज झाला. त्यानंतर आमदार नीतेश राणे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, रणजित देसाई, मधुसूदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, ‘‘राज्यात शिवसेनेची सत्ता स्थापन होऊन तीन वर्षे झाली. मात्र, पालकमंत्री केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी असमर्थ ठरले आहेत. राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, ग्रामीण रस्त्यावर पडलेले खड्डे, आरोग्य शिक्षण क्षेत्रातील अपयश या तीन वर्षात जनतेच्या लक्षात आले आहे. पर्यटन जिल्ह्यासाठी राणेंच्या माध्यमातून होवू घातलेला सी-वर्ल्ड प्रकल्प, विमानतळ, रेडी बंदर, एमआयडीसी हे प्रकल्प पूर्ण होवू शकले नाहीत. पाटबंधारे प्रकल्पाला निधी मिळालेला नाही. जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेला विमानतळ २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा विमानतळ २०२० सालापर्यंतही पूर्ण होईल याची शक्‍यता नाही.’’

ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा पालकमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या श्री. केसरकर यांच्या अपयशामुळे बदनाम होवू लागला आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्याच्या काही भागात होणारे खून आणि त्याचे मृतदेह हे आंबोलीत सापडत आहेत. त्यामुळे आंबोली हे पर्यटन स्थळही बदनाम झाले आहे.’’

गाव तिथे स्वाभिमान पक्षाची स्थापना केली जाणार असून या मोहिमेचा शुभारंभ मालवण येथे होणार आहे. स्वाभिमानचे निर्माते नारायण राणे यांच्या हस्ते राज्य स्वाभिमान पक्ष सभासद नोंदणीचा प्रारंभ लवकरच होणार आहे.

उंदीर मारा मोहीम... 
जिल्ह्यात उद्‌भवलेल्या तापसरीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी जनतेला उंदीर मारा असे आवाहन केले होते. या मोहिमेची सुरवात ८ डिसेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आम्ही करणार आहोत. तापसर नियंत्रणात आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे झालेले दुर्लक्ष, अपुरे डॉक्‍टर, कोमात गेलेल्या आरोग्यव्यवस्थेचा या वेळी निषेध करण्यात येणार आहे, असे सामंत म्हणाले.

केसरकर ‘होम मिनिस्टर’
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. याला अकार्यक्षम गृह राज्यमंत्री आहेत. याचे कारण केसरकर हे राज्याचे गृह राज्यमंत्री नसून, आदेश बांदेकरांच्या मालिकेतील ते होम मिनिस्टर आहेत, अशा शब्दांत सामंत यांनी टीका केली.

नियोजनची बैठक नाहीच 

पालकमंत्री केसरकर यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. मात्र, निधीची कपात केली जात आहे. भात खरेदी केली जात नाही. विकासाला निधीच मिळत नसल्याने अनेक कामे ठप्प आहेत. विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग दहा वर्षे मागे गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com