आंबोलीतील मृतदेह कोल्हापूरातील असल्याचा प्राथमिक अंदाज 

आंबोलीतील मृतदेह कोल्हापूरातील असल्याचा प्राथमिक अंदाज 

आंबोली - येथील कावळेसाद पॉईंटमधील दरीत आज आणखी दोन मृतदेह सापडले. पेहरावावरुन ते मृतदेह तरुण तरुणीचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पूर्णतः सडलेले असल्याने त्यांची ओळख पटणे कठीण आहे; मात्र मुरगुड येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या सिद्धार्थ मोरे (वय 22) व त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीचे हा मृतदेह असल्याचा व त्यांनी आत्महत्त्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. मृतदेहांशेजारी सापडलेल्या वस्तू आणि साहित्यावरून पोलिसांनी हे अंदाज वर्तवले असून पोलिस अधिक शोध घेत आहेत. 

आंबोली कावळेसाद येथील दरीत चार दिवसांपूर्वी एक मृदेह सापडला होता. तो गडहिंग्लजमधील शिक्षकाचा असल्याचे पुढे आले. हा मृतदेह काढण्यासाठी बाबल आल्मेडा व त्यांची टिम दरीत उतरली असता त्यांना आणखी दोन मृतदेह दिसले. हे मृतदेह कावळेसाद येथील धबधब्याचे पाणी जेथे पडते त्या परिसरात होते; मात्र त्या दिवशी मृतदेह काढणे शक्‍य नव्हते. आल्मेडा व त्यांच्या टिमने याची माहिती पोलिसांना दिली. ते शोधण्यासाठीची मोहिम आज सकाळी हाती घेतली. श्री. आल्मेडा यांच्यासह किरण नार्वेकर, फिलिप्स आल्मेडा, सागर सांगेलकर, पोलिस गजानन देसाई हे दरीत उतरले. दोन्ही मृतदेह दोरीच्या मदतीने वर आणण्यात आले. 

मृतदेह पूर्णपणे सडलेल्या स्थितीत होते. त्यातील तरुणीच्या मृतदेहाच्या अंगावर जीन्स व टी शर्ट आहे. केस मध्यम लांबीचे आहेत. पुरुषाच्या अंगावर काळी पॅंट व चॉकलेटी रंगाचा शर्ट होता. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविले आहेत. ते सावंतवाडी येथे शवागृहात ठेवण्यात येणार आहेत. मृतदेह वर घेण्यासाठी सुनील मातोंडकर, अभय किनळोसकर, प्रज्ञेश गावडे, संतोष राऊळ, वामन नार्वेकर, संतोष सावंत, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, दाजी माळकर यांनी प्रयत्न केले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक अरुण जाधव, दीपक सुतार, विकास गवस, एम.आय. फर्नांडिस, राजेश गवस, अमोल सरंगळे, हवालदार विश्‍वास सावंत, मंगेश कदम, गजानन देसाई आदींनी पंचनामा केला. 

दरम्यान, हे मृतदेह महिन्याभरापूर्वीचे असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. मुरगूड (राधानगरी) येथील सिद्धार्थ मोरे याचा हा मृतदेह असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिन्याभरापूर्वी त्याने आणलेली मोटरसायकल कावळेसाद पॉईंटजवळ सापडली होती. सिद्धार्थ हा करवीर भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षांच्या मुलीसोबत महिनाभरापूर्वी आंबोलीत रहायला होता. ते दोघेही 7 ऑक्‍टोबरला येथे राहायला आले. 9 ऑक्‍टोबरला त्यांनी हॉटेलमधून चेकआऊट केले. सिद्धार्थने आणलेली दुचाकी (एम.एच.09- एसी- 7402) 10 ऑक्‍टोबरपासून कावळेसाद येथे बेवारस स्थितीत आढळली होती. गेळे पोलिस पाटलांनी 11 ऑक्‍टोबरला याबाबतची माहिती येथील पोलिस दूरक्षेत्रात दिली. त्या गाडीच्या नंबरवरुन पोलिसांनी तिच्या मालकाचा शोध घेतला. ही गाडी सुरेश मोरे (रा. मुरगुड) यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर श्री. मोरे आंबोलीत आले होते. आपला मुलगा सिद्धार्थने गाडी आणल्याचे त्यांनी सांगितले होते. सिद्धार्थ बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी मुरगुड पोलिसात दिली. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आंबोलीतील लॉजिंगमध्ये चौकशी केली. यात एका हॉटेलमध्ये सिद्धार्थ एका मुलीसोबत दोन दिवस राहिल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुरावा म्हणून दिलेल्या ओळखपत्राची पाहणी केली असता ती करवीरमधील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले होते. अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. या मृतदेहांशी त्यांचा संबंध असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. ही आत्महत्त्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सिद्धार्थ यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी बोलावले आहे. 

दरम्यान, याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सिद्धार्थ आणि त्यासोबत असलेल्या मुलीचा हा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या नातेवाईकांना कळविले आहे; मात्र त्यांच्याकडून खात्री झाल्यानंतरच ठोसपणे ओळख पटली असे म्हणता येईल. सध्या तरी तो केवळ अंदाज आहे. 

नेमके समजले केव्हा? 
गडहिंग्लज येथील शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी दरीत उतरलो असता मृतदेह आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे; मात्र संबंधीत मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून दूर अंतरावर हे दोन्ही मृतदेह होते. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच पोलिसांना खाली मृतदेह असल्याची माहिती असल्याचे पुढे आले आहे. 

प्रथमदर्शनी हा आत्महत्त्येचा प्रकार वाटतो. शवविच्छेदन अहवालानंतरच घातपात की आत्महत्त्या हे स्पष्ट होईल. आताच्या घडीला ठामपणे ते मृतदेह कुणाचे आहेत ते सांगता येणार नाही. आजुबाजूच्या सर्व पोलिस ठाण्यांकडून गेल्या महिन्याभरातील बेपत्ता झालेल्यांची माहिती मागविण्यात येईल. ज्या शक्‍यता आहेत त्याही पडताळल्या जातील. 
- सुनील धनावडे, पोलिस निरीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com