सिंधुदुर्गात मत्स्योत्पादनात घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मालवण - सिंधुदुर्गात यंदा मत्स्योत्पादनात घट झाली आहे. राज्याच्या इतर भागात मत्स्योत्पादन वाढले असताना जिल्ह्यात झालेली घट चिंतेचे कारण बनली आहे. गतवर्षीच्या तुलनेत १७२३ टनाने उत्पादन कमी झाले. अवैध मासेमारीमुळे ही स्थिती ओढवली आहे. 

मालवण - सिंधुदुर्गात यंदा मत्स्योत्पादनात घट झाली आहे. राज्याच्या इतर भागात मत्स्योत्पादन वाढले असताना जिल्ह्यात झालेली घट चिंतेचे कारण बनली आहे. गतवर्षीच्या तुलनेत १७२३ टनाने उत्पादन कमी झाले. अवैध मासेमारीमुळे ही स्थिती ओढवली आहे. 

मत्स्यविभागाने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळातही मत्स्योत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. पूर्ण राज्यात यंदा ४ लाख ७४ हजार ९९२ टन उत्पादन मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत १२ हजार २४५ टनाने उत्पादन वाढले आहे; मात्र सिंधुदुर्गात उत्पादनात घट झाली आहे. जिल्ह्यात २० हजार ५८२ टन मत्स्योत्पादन झाले. २०१५-१६ मध्ये १७ हजार ६९९ टन उत्पादन होते. गेल्या वर्षी ते २२ हजार टन झाले. राज्याने दोन वर्षापूर्वी शाश्‍वत मासेमारीसाठी विविध उपाय योजले. यामुळे अवैध मासेमारीला लगाम बसला.

यामुळे राज्याचे मत्स्योत्पादन वाढले; मात्र सिंधुदुर्गात उलटी स्थिती आहे. जिल्ह्यातील उत्पादनात झालेली घट अवैध मासेमारीमुळे असल्याचे मानले जाते. जिल्ह्यात एलईडी मासेमारी, हायस्पीड बोटीव्दारे मासेमारी सुरू आहे. या विध्वंसकारी मासेमारीमुळे परीप्रांतीय ट्रॉलर्सना मोकळे रान मिळाले आहे. त्याचा परिणाम म्हणून येथील उत्पादनात घट झाल्याचे मच्छिमारांचे म्हणने आहे. 

‘सिंधुदुर्गात मासळीची मोठ्याप्रमाणात लुट सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अपूरी आहे. गेल्या काही काळात मच्छिमारांसाठीची आंदोलने विस्कळीत झाली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून मत्स्योत्पादनात घट झाली आहे. अवैध मासेमारी रोखण्यासाठी सक्षम यंत्रणेबरोबरच त्यावर नियंत्रणासाठी दबावगटाची आवश्‍यकता आहे.’’
- महेंद्र पराडकर, 

मासेमारी प्रश्‍नांचे अभ्यासक

महाराष्ट्राची स्थिती
(मत्स्योत्पादन टनात)
१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ चे मत्स्योत्पादन
सिंधुदुर्ग    २०,५८२
रत्नागिरी    ८०,३४०
रायगड    ५३,३३८
मुंबई शहर    १,४०,१०५
मुंबई उपनगर    ६६,२२८
ठाणे    १,१४,३९९

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्योत्पादन
(मत्स्योत्पादन टनात)
२०११-१२    २४,५६३
२०१२-१३    २६,४७९
२०१३-१४    २७,२८३
२०१४-१५    २१,६५०
२०१५-१६    १७,६९९
२०१६-१७    २२,३०५
२०१७-१८    २०,५८२

महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन (मत्स्योत्पादन टनात)
वर्ष          मत्स्योत्पादन
२०११-१२    ४,३३,६८०
२०१२-१३    ४,४८,९१३
२०१३-१४    ४,६७,४८५
२०१४-१५    ४,६३,५८३
२०१५-१६    ४,३४,११५
२०१६-१७    ४,६२,७४७
२०१७-१८    ४,७४,९९२ 

Web Title: Sindhudurg News Decrease in fish production