पाडगावकर स्मारकाची संकल्पना उत्कृष्ट - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

वेंगुर्ले - ‘मंगेश पाडगावकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेले एक नररत्न आहे. उभादांडा येथील त्यांच्या स्मारकाची कल्पना उत्कृष्ट आहे. कविता ही वाचल्याशिवाय व कोरल्याशिवाय अजरामर होत नाही,’ असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

वेंगुर्ले - ‘मंगेश पाडगावकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेले एक नररत्न आहे. उभादांडा येथील त्यांच्या स्मारकाची कल्पना उत्कृष्ट आहे. कविता ही वाचल्याशिवाय व कोरल्याशिवाय अजरामर होत नाही,’ असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

उभादांडा (ता. वेंगुर्ले) येथे मंगेश पाडगावकर यांच्या शाळेत, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. केसरकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मंगेश पाडगावकर यांचे पुत्र अजित पाडगावकर, अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते, उद्योजक रघुवीर मंत्री, येथील तहसीलदार शरद गोसावी, पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी, साहित्यिका सीमा मराठे, वृंदा कांबळी,  सरपंच देवेंद्र डिचोलकर, अतुल हुले, काका कुडाळकर, एमटीडीसीचे अधिकारी श्री. कल्पे, जयप्रकाश समनकर, मुख्याध्यापक कांडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

समृद्धीतून समाधान मिळते व समाधानातून साहित्य फुलते असे सांगून श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘साहित्य निर्माण होण्यासाठी तसे वातावरण निर्माण व्हावे लागते. उभादांडा ही समृद्ध भूमी असल्याने येथे साहित्यीक घडविण्याची क्षमता आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. वेंगुर्लेचे वेगळेपण जपण्याची जबाबदारी वेंगुर्लेकरांची आहे.’’

या वेळी केसरकर यांनी पाडगावकरांची ‘कोऱ्या कोऱ्या कागदावर जरी छापले, ओठांवर आल्याशिवाय गान नाही आपले..’ ही कविता वाचून दाखवली. कवीतेमध्ये किती मर्म असते याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. कविता राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आपण वाचली. त्यामुळे ही कविता राज्याच्या विधानभवनामध्ये कायमची कोरली गेली आहे.

पाडगांवकरांचे स्मारक म्हणजे कवितांचे गाव असणार आहे. यामध्ये भेट देणाऱ्यांसाठी त्यांच्या निवडक कविता वाचनासाठी उपलब्ध असतील. या कविता झाडांवर कोरल्या जाणार आहेत. याशिवाय ८ ते १० ठिकाणी कविता वाचनाची सोय उपलब्ध करावी, त्यामध्ये सर्व भाषांमधील कवितांचा समावेश करण्यात यावा, तरच कवितांचा गाव ही संकल्पना खऱ्या अर्थाने सिद्ध होईल असेही ते म्हणाले.

या वेळी उभादांडा शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. गावकरी व साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Deepak Kesarkar Comment