‘गोमेकॉ’तील उपचारांचा खर्च शासन करणार - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

सावंतवाडी - ‘गोवा-बांबुळी (गोवा मेडिकल कॉलेज) येथे उपचार घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा खर्च महाराष्ट्र शासनाकडून उचलण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात येईल,’ अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

सावंतवाडी - ‘गोवा-बांबुळी (गोवा मेडिकल कॉलेज) येथे उपचार घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा खर्च महाराष्ट्र शासनाकडून उचलण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात येईल,’ अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे. हा निर्णय बदलण्यात यावा किंवा महाराष्ट्र शासनाने उपचाराचा खर्च करावा, अशी मागणी सिंधुदुर्गातून झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र फाटक यांनी विधिमंडळातील चर्चेवेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. केसरकर यांनी ही माहिती दिली होती.

तो संदर्भ देऊन श्री. केसरकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की गोवा शासनाकडून बांबुळी रुग्णालयात उपचाराचे शुल्क आकारण्यात आले आहे. हा निर्णय एक जानेवारीपासून घेण्यात आला होता. दरम्यान, त्याचा फटका अनेक रुग्णांना सहन करावा लागला होता. यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. राजकारण रंगले होते. लोकांची मागणी लक्षात घेता शुल्काचा निर्णय मागे घेण्यात यावा किंवा महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी सिंधुदुर्गातून सर्व पक्षांतर्फे करण्यात आली होती. 

दरम्यान, काजू बागायतदारांचा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. नव्याने जाहीर झालेल्या धोरणात जीएसटीमुळे काजू बागायतदारांना फटका सहन करावा लागत आहे; त्यामुळे नव्या धोरणात त्यांचा विचार करण्यात यावा अशी मागणी सभागृहात करण्यात आली. त्याला उत्तर देताना श्री. केसरकर यांनी काजू बागायतदारांना मदत करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असे सांगितले.

Web Title: Sindhudurg News Deepak Kesarkar Comment