अॅम्युझमेंट पार्कसाठी ३ कोटी - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सावंतवाडी - येथील भोसले उद्यानात अॅम्युझमेंट पार्क उभारणार आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची घोषणा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली.

सावंतवाडी - येथील भोसले उद्यानात अॅम्युझमेंट पार्क उभारणार आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची घोषणा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली. येथील पालिकेच्या पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्याक्रमात ते बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, ‘‘जगन्नाथराव भोसले उद्यानासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून उद्यानात लहान मुलांसाठी मोनो रेल आणण्यात येणार आहे. त्यासाठी या एकूण निधीतील दोन कोटी रुपये व अॅम्युझमेट पार्कसाठी ३ कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या विकासासाठी या आधीच पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सावंतवाडीचा हा महोत्सव कौटुंबिक महोत्सव आहे.

तालुक्‍यातील व शहरातील नागरिकांचा तो एक स्नेहमेळावाच आहे. नागरिक स्टॉल उभारतात. त्यातून व्यावसाय मिळतो.’’
ते म्हणाले, ‘‘झाराप पत्रादेवी महामार्ग शहराबाहेरून गेला. त्यामुळे सावंतवाडी शहराचे नाव कमी झाले नाही. आता रेडी-बेळगाव व कोल्हापूर-वेंगुर्ले हे दोन्ही महामार्ग शहरातूनच जाणार आहेत. त्यासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महामार्ग शहरातून जावो अथवा नाही, तरीही शहराचे वैभव कायम राहणार आहे. हा पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यात पालिकेचे नगरसेवक, कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचे खरोखरच कौतुक आहे. ७ जानेवारीला राज्यात स्वच्छतेचे परीक्षण होणार आहे. यात पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे. त्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.’’

नगराध्यक्ष श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘पालिकेतील कर्मचारी वर्गाच्या मेहनतीमुळेच हा महोत्सव होऊ शकला. पालिकेला १ जानेवारीला १४० वर्षे पूर्ण होत आहेत. ७ जानेवारीला होणाऱ्या स्वच्छतेच्या परीक्षणात प्रथम क्रमांक पटकावायचा असल्यास शहरवासीयांनी मोठी साथ दिली पाहिजे.’’ 

व्यासपीठावर नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, अनारोजीन लोबो, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, आरोग्य सभापती आनंद नेवगी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगसेविका दीपाली सावंत, दीपाली भालेकर, राजू बेग, परिमल नाईक, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होत्या. 

Web Title: Sindhudurg News Deepak Kesarkar comment