विजयदुर्ग ते शिरोडा किनारा विकसित करू - दीपक केसरकर

विजयदुर्ग ते शिरोडा किनारा विकसित करू - दीपक केसरकर

देवगड - स्थानिक व्यापार वृद्धीसाठी पर्यटन हा सक्षम पर्याय असून पर्यटनामध्ये सिंधुदुर्ग मागे राहणार नाही, यासाठी आपले प्रयत्न आहेत. लवकरच विजयदुर्गपासून शिरोड्यापर्यंतचा सागरी किनारा पर्यटनातून विकसित झालेला दिसेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जामसंडे येथे केले.

ग्रामीण भागातील छोट्या गावापर्यंत पर्यटन संकल्पना रुजवली जाईल तेव्हाच खऱ्याअर्थाने भाग विकसित होईल, असे नमूद करून परदेशी पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखण्याचे आवाहनही त्यांनी 
यावेळी केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३० वा व्यापारी एकता मेळावा जामसंडे येथील सांस्कृतिक भवन परिसरामध्ये आज झाला. मेळाव्याचे उद्‌घाटक म्हणून केसरकर बोलत होते. मंचावर खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, प्रमुख मार्गदर्शक बी. व्ही. जी. ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आशीष पेडणेकर, सभापती जयश्री आडिवरेकर, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, तालुकाध्यक्ष प्रसाद पारकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी अन्य तालुक्‍यांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी ‘दीपस्तंभ’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांचा गौरव आयोजकांच्या वतीने करण्यात आला. ज्येष्ठ व्यापारी बाबा कुळकर्णी, रंजना कदम यांचा सन्मान करण्यात आला. 

खासदार राऊत म्हणाले, ‘‘जिल्ह्याचा विकास होण्यास आता खरी सुरुवात झाली असल्याचे नमूद करून पर्यटनामधून जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या जीएसटी भरणा व्यवस्थेमध्ये सुलभता आणण्याची गरज आहे.’’

विकासाचे पुढील दहा वर्षाचे नियोजन हवे. व्यवसाय वाढवण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. व्यापाऱ्यांना व्यवसायामध्ये सुरक्षितता हवी असते ती देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. व्यापाऱ्यांना दैनंदिन जाणवणाऱ्या अडचणी दूर केल्या तर त्यांचा त्रास कमी होईल. व्यापाऱ्यांनीही सुरक्षित आणि आदर्श बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पर्यटनावर आधारित विकास झाला पाहिजे.

-नीतेश राणे, आमदार

यावेळी वळंजू यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्वागताध्यक्ष प्रमोद नलावडे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले. जिल्हा कार्यवाह महेश नार्वेकर यांनी अहवाल वाचन केले.

ग्रीन रिफायनरी होऊ देणार नाही - राणे
या वेळी आमदार राणे म्हणाले, ‘‘ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प आल्यास भविष्यात व्यवसायातील सुरक्षितता धोक्‍यात येऊ शकते; मात्र तसे आपण होऊ देणार नाही. प्रकल्पाला आपला विरोध राहील. त्यामुळे निश्‍चिंत राहावे.’’

आंतरराष्ट्रीय पर्यटक जिल्ह्यात येण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. विजयदुर्ग, देवगडमधील पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सिंधुदुर्ग पर्यटनामध्ये मागे राहणार नाही यासाठी आपले प्रयत्न असून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर राहील. यासाठी नगरपंचायतींना नगरात्थोनमधून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. पर्यटनामधून विकास साधण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकसंधपणा कायम राखावा.
- दीपक केसरकर,
पालकमंत्री, सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com