कोथळे हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे निश्‍चित झाले आहे. यापुढे आरोपी कोठडीमध्ये मृत्यू होऊ नये, तसेच पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  येथे दिली. 

सावंतवाडी - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे निश्‍चित झाले आहे. यापुढे आरोपी कोठडीमध्ये मृत्यू होऊ नये, तसेच पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  येथे दिली. 

दरम्यान, डोंगराळ भागात तुरळक लोकवस्तीचा फायदा घेत अनेक गुन्हे लपविण्यात येतात. त्यामुळे आंबोलीत माथेरानच्या पार्श्‍वभूमीवर टुरिझम पोलिस ठाणे उभारण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, ""कोपर्डीच्या घटनेत पोलिस यंत्रणेने चांगले काम करून दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. तशाच प्रकारे सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचे तपास काम केले जाईल. आरोपी पोलिस आहेत, त्यामुळे त्यांची गय केली जाणार नाही. या प्रकरणाचा न्यायालयीन लढा सरकारी वकील उज्ज्वल निकम लढणार आहेत. याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे.'' 

शेतकरी आंदोलन गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांना आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे शेतकरी आंदोलनावेळी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी स्वतः आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढतील, असेही केसरकर म्हणाले. 

पोलिस यंत्रणेचा लोकांना त्रास होऊ नये, तसेच पोलिस ठाण्यात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी वेगळी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर निश्‍चितच फरक दिसेल, असा विश्‍वास केसरकर यांनी व्यक्त केला. 

केसरकर पुढे म्हणाले, ""आंबोलीतील डोंगराळ भाग आणि तुरळक लोकवस्तीचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. आंबोली हे पर्यटनस्थळ आहे. तेथे क्राईम रेट कमी असला तरी पर्यटकांची संख्या लक्षात घेता माथेरानला मंजूर झालेल्या टुरिझम पोलिस ठाण्याच्या धर्तीवर आंबोलीत पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल.'' 

Web Title: Sindhudurg News Deepak Kesarkar Press