ग्रामपंचायत निवडणुकांत सेना-भाजपने एकत्र यावे : केसरकर

अमोल टेंबकर
सोमवार, 29 मे 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकीत युती फिस्कटल्याने त्याचा फायदा काॅग्रेसला झाला होता.

सावंतवाडी : "आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपाने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात. चुकीचे लोक सत्तेबाहेर राहण्यासाठी हे गरजेचे आहे. मागच्या सारखी चूक पुन्हा नको," असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
शिवसेनेच्या सावंतवाडी विधानसभा प्रमुखपदी निवड झालेल्या विक्रांत सावंत यांना वाढदिवस काल रात्री उशिरा येथील राणी पार्वतीदेवी महाविदयालयाच्या पटागंणावर साजरा करण्यात आला यावेळी केसरकर बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रकाश परब, एकनाथ नारोजी, अरविंद नाईक, शहर प्रमुख शब्बीर मणीयार, गणपत सावंत, मेघश्याम काजरेकर, धन गवस, रश्मी माळवदे, सागर नाणोसकर, प्रशांत कोठावळे, तेजस परब, बबन राणे चद्रकांत कासार आदी उपस्थित होते. 

यावेळी केसरकर पुढे म्हणाले, जिल्ह्याचा विकास करायचा आहे त्यामुळे येणार्‍या काळात युवा वर्ग शिवसेनेकडे आकर्षित होणे गरजेचे आहे. ते काम सावंत यांच्या माध्यमातून होणार आहे याचा मला अभिमान आहे.  विक्रांत हे मला माझ्या मुलाप्रमाणे आहेत. त्यांचे आजोबा स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे लोकांच्या कल्याणासाठी झटले, तर पिता विकास सावंत हे यांनीसुध्दा पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता कायम सर्वसामान्य लोकांसाठीच काम केले. त्याचा वारसा विक्रांत हे चालवित आहे याचा मला अभिमान आहे.

केसरकर पुढे म्हणाले, "जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्यामुळे आगामी काळात येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकानंतर जास्तीत जास्त जागा या शिवसेना भाजपाच्या ताब्यात येणे आवश्यक आहे. मागच्या निवडणुकात झालेली चुक पुन्हा झाल्यास चुकीच्या लोकांच्या हातात ग्रामपंचायती जातील, त्यामुळे आता दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे."

या कार्यक्रमाचे औचित्य साधून केसरकर यांनी विक्रांत यांना तलवार भेट दिली. तत्पुर्वी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजपाचे नेते संदेश पारकर उदयोजक तथा जिंदाल समुहाचे उपाध्यक्ष पुष्कराज कोल्हे यांनी सावंत यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या डबलबारीच्या सामन्यासाठी भजनप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

सावंतवाडीच्या उद्यानासाठी तीन कोटी 
यावेळी केसरकर म्हणाले सावंतवाडी पालिकेच्या उद्यानात कायमस्वरुपी नव्याने खेळणी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी लवकरच नगराध्यक्ष आणी पालिका पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार आहे. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून आणखी काही निधी सावंतवाडी पालिकेसाठी देण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्या :

Web Title: sindhudurg news deepak kesarkar shiv sena bjp fight together gram panchayat