कुडाळात उड्डाण पूल न उभारल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सिंधुदुर्गनगरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली शहराप्रमाणे कुडाळ शहरासाठीही उड्डाण पूल मंजूर करावे, अशी मागणी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली शहराप्रमाणे कुडाळ शहरासाठीही उड्डाण पूल मंजूर करावे, अशी मागणी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या आठ दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा, अन्यथा कुडाळ बंदची हाक देऊन जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

कुडाळ तालुका बाजार समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांची भेट घेऊन कुडाळ तालुक्‍यातून जाणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामात बद्दल चर्चा करण्यात आली .यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अॅड राजीव बिले, प्रशांत राणे, काका कुडाळकर, संजय पडते, शिल्पा घुर्ये, गजानन कांळगावकर ,प्रज्ञा राणे, राजन नाईक, राजेंद्र जाधव, रूपेश पावसकर, सचिन काळप, सफराज नाईक, प्रसाद गावडे आदी सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते. बचाव समितीने सध्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

कुडाळ तालुक्‍यातील महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनतेला कोणत्या सुविधा मिळणार आहेत, याबाबत आजही या भागातील जनता अनभिज्ञ आहे. त्यामुळे काही भागातील जनता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. ठेकेदारांकडून रस्ता सुरक्षा बाबतचे योग्य उपाय केले नसल्याने आतापर्यंत पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येक जण जायबंदी झाले आहेत.

करण्यात आलेल्या मागण्या अशा - 

  • कसाल ते झारापपर्यंत दोन्ही बाजू सर्विस रोड करण्यात यावा.
  • महामार्गावर सद्यस्थितीत असलेले एसटी बस थांबे त्याच पद्धतीने नव्याने होणाऱ्या महामार्गावर असावेत.
  • महामार्गाच्या बहुतांशी भागात एका बाजूंना शेती व दुसऱ्या बाजूला लोकवस्ती अशी स्थिती आहे. त्यामुळे अंडरपास मंजूर करण्यात यावेत.
  • कसाल ते झारापपर्यंत महामार्गावर थ्रीडी मॉडेल उपलब्ध व्हावे.
  • कुडाळ शहरामध्ये आवश्‍यक त्याठिकाणी सर्कल मंजूर व्हावे.
  • तेर्सेबांबर्डे पंचक्रोशी भागातील जनतेची बॉक्‍स वेलची मागणी पूर्ण करावी.
  • कुडाळ आंबडपाल, मुळदे, घावनाळे गावांना जोडणारा हायवे जवळील रस्ता अस्तित्वात आहे त्याठिकाणी बॉक्‍स वेल स्वरूपात जोड रस्ता अस्तित्वात ठेवण्यात यावा.
  • कुडाळ येथील राज हॉटेल ते आरएसएन हॉटेल पर्यंत उड्डाणपूल व्हावे.

...तर कुडाळ बंद आंदोलन छेडू
कुडाळ बचाव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या या सर्वांच्याच हिताचे असल्यामुळे जिल्हा प्रशासन यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा. त्यादृष्टीने येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा कुडाळ बंदची हाक देऊन जन आंदोलन छेडू, असा इशारा या समितीने जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना दिला.

Web Title: Sindhudurg News demand of flyover bridge in Kudal