देवधर प्रकल्पग्रस्त ‘आरपार’च्या भूमिकेत

देवधर प्रकल्पग्रस्त ‘आरपार’च्या भूमिकेत

सिंधुदुर्गनगरी - देवधर धरणासाठी घोणसरीतील ग्रामस्थांच्या जमिनी घेतल्या. धरणही पूर्ण झाले; मात्र त्यांना अद्याप निवासी भूखंड मिळालेले नाहीत. यामुळे बेघर झालेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आता ‘आरपार’च्या लढाईची तयारी केली आहे. ते १५ ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत.

देवधर माध्यम पाठबंधारे घोणसरी प्रकल्पग्रस्तांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देवधर मध्यम पाठबंधारे प्रकल्प घोणसरीसाठी घोणसरी ग्रामस्थांच्या जमिनी, घरे व इतर मालमत्ता शासनाने संपादित केल्याने तेथील कुटुंबे विस्थापित होऊन बेघर झाली आहेत.

याबाबत संबंधित विभागाकडे अर्ज विनंत्या अनेकवेळा करूनही त्यांची शासनाकडून दखल घेतली नाही. यासाठी अनेकवेळा आंदोलने, उपोषणे केली. त्यावेळी संपादन संस्था व पुनर्वसन विभागाने लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषणे व आंदोलन मागे घेतले; मात्र आश्‍वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही.

घोणसरी धरणग्रस्त ग्रामस्थांची मागणी रास्त व निकषात बसत असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पात्र भूखंडधारकांची यादी निश्‍चित करून पुनर्वसन गावठणसाठी लागणाऱ्या जमिनी मागणी करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांना दिले होते.

त्यानुसार पुनर्वसन विभागाकडून मागणी करूनही जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. यामुळे निवासी भूखंड वाटपाचा प्रस्ताव अद्यापही धुळखात पडला आहे. तरी याबाबत योग्यती कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट २०१८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्त घोणसरी ग्रामस्थांनी दिला आहे.

घोणसरी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मॅक्‍सी पिंटो, एकनाथ परब, गणेश परब, विजय रासम, दीपक सावंत, साधना साळवी, गणेश जाधव, निवृत्ती चाळके, प्रदीप गोरूले, विलास आयरे, सिताराम परब उपस्थित होते.

भूसंपादन आणि पुनर्वसन खात्याच्या चालढकलपणामुळे गेली १२ वर्षे फसवणूक सुरू आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे ५५ कुटुंबांना निवासी भूखंड मिळायला हवे होते. आम्ही तशी मागणी केली होती. यासाठी सातत्याने निवेदन दिली, उपोषण केले, प्रत्येकवेळी भुखंड देऊ, असे सांगत वेळ मारून नेली. यामुळे प्रकल्पाग्रस्त आता संतप्त झाले आहेत.
- मॅक्‍सी पिंटो, 

अध्यक्ष, कुर्ली घोणसरी देवघर पाटबंधारे धरणग्रस्त कृती समिती.

कामेही अर्धवट
धरणाचा पाणीसाठा होऊन वीजनिर्मिती सुरू झाली. याचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. नियोजित कालव्यांची कामे सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्त आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. गावठणातील सुविधाही अपुऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com