डॉ. उबाळेंवरील गुन्हा प्रश्नी सिंधुदुर्गात खासगी डॉक्‍टरांकडून शासकिय सेवा बंद 

डॉ. उबाळेंवरील गुन्हा प्रश्नी सिंधुदुर्गात खासगी डॉक्‍टरांकडून शासकिय सेवा बंद 

सिंधुदुर्गनगरी - विवाहितेच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूप्रकरणी वेंगुर्लेतील स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजेश उबाळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा एकतर्फी चौकशी अहवालामुळे आहे असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेने केला आहे. याच्या निषेधार्ह जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्‍टरने आजपासून शासकिय रूग्णालयातील आपले काम थांबवले आहे. 

वेंगुर्ले येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या वैद्यकिय गुंतागुंतीमुळे निलम राऊळ यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार स्त्रिरोगतज्ञ डॉ. उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा आयएमए संघटनेने निषेध केला. एनआरएचएम आणि आयआरएचएस योजने अंतर्गत खाजगी डॉक्‍टर शासकिय रूग्णालयात करत असलेले काम आजपासून बंद केले.

जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिलेल्या एकतर्फी अहवालामुळे दाखल झालेला हा गुन्हा चुकिचा असल्याचे संघटनेचे म्हणणे असून याबाबत राज्यस्तरीय चौकशी समिती नेमुन निपक्षपाती चौकशीची मागणी संघटनेने केली. 

आयएमएसह जिल्हा स्त्रीरोग चिकित्सक संघटना, एएमसी, डॉक्‍टर्स फॅटर्नीटी क्‍लब आणि जिल्ह्यातील इतर डॉक्‍टर संघटनांच्या वतीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यात चौकशी अहवालात त्रुटी असल्याचा आणि बऱ्याच मुद्‌द्‌यांचा अभ्यास झाला नसल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. संजय केसरे, डॉ. नितीन शेटये, डॉ. अजित लिमये, डॉ. संजय निगुडकर, डॉ. जी. टी. राणे, डॉ. संजय सावंत आदींच्या सह्या आहेत. 

प्रमुख आक्षेप

  • जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल अपुऱ्या माहितीवर
  • बांबोळीतील गोमेकॉ रूग्णालयातील उपचारांच्या कागदपत्रांचा अभ्यास न करता अहवाल
  • वैद्यकिय अधिक्षक, सबंधीत नर्स, वैद्यकिय अधिकारी यांचा हलगर्जीपणा जाणीवपूर्वक टाळला
  • कोलॉस्टोमीसारखी शस्त्रक्रिया गोमेकॉत का करण्यात आली नाही?

एकतर्फी अहवालाच्या आधारे पंधरा वर्षे सिंधुदुर्ग सारख्या दुर्गम भागात रूग्णसेवा देत असलेल्या तज्ञ डॉक्‍टरवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात अपमानास्पद व निषेधार्ह आहे. या मृत्यूप्रकारणाची राज्यस्तरीय समिती नेमुन चौकशी करावी. गोमेकॉत झालेल्या उपचारांची कागदपत्र तपासली जावीत. अशा कारवाईमुळे शासकिय रूग्णालय जबाबदारी घेत नसल्याचे पुढे येते. त्यामुळे तेथे सेवा देणारे सर्व खाजगी डॉक्‍टरांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होवू शकते.
- इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्ग

 

डॉ. उबाळेंवर कारवाईसाठी राऊळ कुटुंबियांचे उपोषण
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या वेळी चूकीच्या उपचार पद्धतीमुळे मळगांव ब्राह्मणआळी येथील निलम जितेंद्र राऊळ या महिलेचा मृत्यू झाला. याला जबाबदार अससलेल्या वेंगुर्ले ग्रामिण रूग्णालयातील डॉ. राजेश्‍वर उबाळे यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राऊळ कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (ता.1) उपोषण करून लक्ष वेधले.

मृत निलम राऊळ हिचे पती जितेंद्र यांनी झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत लक्ष वेधले आहे. तर संबंधीत डॉक्‍टरवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण छेडले. यावेळी मोठ्या संख्येने राऊळ कुटुंबीय सहभागी झाले होते. आपल्या कुटुंबातील एका महिलेचा डॉक्‍टरच्या हलगर्जीपणा आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे जीव गेला. भविष्यात असा प्रसंगी अन्य कोणावर येवू नये. यासाठी वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालयातील शस्त्रक्रीया करणारे डॉ. राजेश्‍वर उबाळे यांचे मेडिकल लायसन्स तात्काळ रद्द करावे.

जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या अहवालाची प्रत तात्काळ आम्हाला देण्यात यावी. तसेच डॉ. उबाळे यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. 

दरम्यान डॉ. उबाळे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी खाजगी डॉक्‍टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षित गेडा यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर, डॉ. केसरे, डॉ. योगेश नवांकुळ, डॉ. निगुडकर, डॉ. संजय सावंत आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com