दोडामार्ग तालुक्यातील 52 गावात वृक्षतोडीस वनविभागाचा हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

सावंतवाडी - याचिकेतून वगळण्यात आलेल्या सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 52 गावामध्ये वृक्षतोड करण्यास आज येथे वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे, याबाबत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी लेखी आश्‍वासन दिले. 

सावंतवाडी - याचिकेतून वगळण्यात आलेल्या सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 52 गावामध्ये वृक्षतोड करण्यास आज येथे वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे, याबाबत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी लेखी आश्‍वासन दिले. 

वृक्ष तोडीला परवागनी देण्यात यावी आणि आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी आज येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर दोन्ही तालुक्यातील व्यावसायिक व शेतकर्‍यांनी माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.  यावेळी जोपर्यत आपल्या मागण्या पुर्ण होणार नाहीत, तोपर्यत आपण माघार घेणार नाही असा इशारा दिला.  

करण्यात आलेल्या मागण्या

तपासणीच्या नावाखाली अधिकारी त्रास देत आहेत, परवान्यासाठी व्यावसायिक आणि शेतकर्‍यांची पिळवणूक केली जात आहे. वेळेत काम पूर्ण करुन दिले जात नाही.  तपासणीच्या नावाखाली चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो ही चुकीची प्रकीया राबविणे बंद करण्यात यावी तसेच व्यावसायिकांसह शेतकर्‍यांना सहकार्य करावे उगाच कायद्याचा बाऊ करण्यात येवू नये, अशा विविध मागण्या करण्यात आल्या 
त्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणी काम करणार्‍या वनमजुरांना बदलण्यात यावे. सहहिस्सेदारांच्या संम्मतीशिवाय परवानगी मिळत नाही. त्यामुळे हमीपत्रावर नुकसान भरपाई देण्यात यावी, गाडी तपासल्यानंतर खासगी किंवा सरकारी जंगलातील माल आहे. याची चौकशी झाल्यानंतर वाहतूक करण्यात येणारी गाडी सोडुन द्यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या 

श्री चव्हाण यांनी उपस्थितांशी चर्चा केली तत्पुर्वी माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याशी चर्चा करुन शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार आंदोलकांनी मांडलेल्या तेरा ही मागण्या आपण मान्य केल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले 

यावेळी गंगाराम कोळेकर, शिवाजी गवस, बाबी बोर्डेकर, अजित चांदेलकर, समिर शेख, दत्ताराम शेटकर, अरुण घाडी, शकील शेख, अजय शेंडेवाले, बाळकृष्ण गवस, कृष्णा साईल, दिलीप गावडे, मशहुर करोल, याकुब शेख, अशोक गावडे, दत्तात्रय गवंडे आदी उपस्थित होते

अन त्यांना रडू कोसळले
आंदोलना दरम्यान तावडे नामक ग्रामीण भागातील शेतकरी त्या ठिकाणी आले होते. पासकामासाठी आपण तब्बल दोन महीने खेपा घालत आहे, मात्र संबधित अधिकारी आपल्याला तारखा देत आहे. सहा मे रोजी माझ्या मुलींची लग्ने आहेत लाकुड तोडलेले आहे पण आपल्याकडे पैसा नाही आता काय करावे हा प्रश्‍न आहे, असे सांगुन त्यांना रडू कोसळले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी त्यांची बाजू अधिकार्‍यांकडे मांडली 

आत्महत्या झाल्यास वनविभाग जबाबदार

आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्री तळवणेकर म्हणाले, काही अधिकार्‍यांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे सर्वसामान्य व्यावसायिक आणि शेतकर्‍यांना नाहक त्रास देण्याचे काम काही लोकांकडुन सुरु आहे. हा प्रकार सुरूच राहील्यास एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यास त्याला सर्वस्वी वनविभागाचे अधिकारी जबाबदार असतील.

Web Title: Sindhudurg News Dodamarg Taluka tree cutting issue