मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर्षात होणार - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

बांदा - सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेहमीच आरोग्य सुविधांसाठी गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने राज्याने सिंधुदुर्गात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय २०१९ पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असून तेथे महत्त्वाच्या पाच शस्त्रक्रियाही होतील. त्यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच रुग्णालयाचे काम सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली.

बांदा - सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेहमीच आरोग्य सुविधांसाठी गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने राज्याने सिंधुदुर्गात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय २०१९ पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असून तेथे महत्त्वाच्या पाच शस्त्रक्रियाही होतील. त्यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच रुग्णालयाचे काम सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन डॉ. सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ढासळल्याचा सातत्याने आरोप विरोधकांकडून होत असतो; 
मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून माझे काम करत असतो.

आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध योजनांमुळे राज्यात माता, बाल व अर्भक मृत्यूचा दर मोठ्या प्रमाणात घटला आहे. आरोग्य सुविधेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. बांदा परिसरात आलेल्या माकडतापाची साथ आरोग्य खात्यासमोरचे मोठे आव्हान होते; मात्र अभ्यास करून त्यावर नियंत्रण मिळविले आहे. साथीच्या रोगांचे प्रमाण वाढल्याने पुण्याच्या धर्तीवर ओरोस येथे व्हायरॉलॉजी लॅब येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. लॅबमध्ये लेप्टो, केएफडी, स्वाईन फ्ल्यू यासह सर्व तापांचे व रोगांचे निदान कमी वेळेत करता येणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात यूरॉलॉजी, नेप्रॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, कार्डियाक, पेडियाट्रिक शस्त्रक्रिया होणार आहे.’’ 

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘इमारतीचे काम अपूर्ण राहिल्यानेच उद्‌घाटन करण्यात आले नव्हते. मात्र काही उतावीळ नेते राजकीय फायदा घेण्यासाठी अपूर्ण इमारतीचे उद्‌घाटन करून स्टंटबाजी करत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यावर आमचा भर आहे. यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.’’ 

कोल्हापूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. पी. धारुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर, कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा परिषद सदस्या श्‍वेता कोरगावकर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, रूपेश राऊळ, अन्वर खान, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत सौदी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. बी. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. जगदीश पाटील, डॉ. प्रणाली कासार, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, राजेश विर्नोडकर, अन्वर खान उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाला रुग्ण कल्याण समिती, जिल्हा परिषद अध्यक्षा व आरोग्य सभापती यांना निमंत्रण नसल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

मायनिंग फंडातून जादा पगार
कोकणात एमबीबीएस डॉक्‍टर येण्यास नाखूश असतात. त्यासाठी मायनिंग फंडातून विशेष अनुदान डॉक्‍टरांच्या पगारासाठी देण्याचा शासनाचा विचार आहे. सिंधुदुर्गात पायलट प्रोजेक्‍ट म्हणून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Dr Deepak Sawant comment