आरती प्रभूंच्या स्मृतीची पुरस्कारातून जोपासणा - डॉ. आगाशे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कुडाळ -  ‘आरती प्रभूंनी आपल्या साहित्यातून जगाला फार मोठी देणगी दिली. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. कुडाळवासीय त्यांची स्मृती पुरस्कार माध्यमातून जपत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी येथे केले. 

कुडाळ -  ‘आरती प्रभूंनी आपल्या साहित्यातून जगाला फार मोठी देणगी दिली. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. कुडाळवासीय त्यांची स्मृती पुरस्कार माध्यमातून जपत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी येथे केले. 

येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची आरती प्रभू कला अकादमी या दोन संस्थाच्या वतीने डॉ. अनिल नेरुरकर पृरस्कृत नाटक किंवा कविता या क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना थोर साहित्यिक आरती प्रभू यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या सहाव्या पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुसकर यांची निवड झाली. त्याचे वितरण जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, आरती कला अकादमीचे अविनाश तळेकर, वर्षा वैद्य, चंदू शिरसाट, प्रकाश पाटणकर, डॉ. अनिल नेरुरकर, आनंद वैद्य, अरविंद शिरसाट, सुरेश चव्हाण, केदार सामंत, साहित्यिक प्रेमी, अमेरिका स्थित डॉक्‍टर, कुडाळवासीय,  कोमसापचे पदाधिकरी उपस्थित होते.

डॉ. आगाशे म्हणाले,‘‘आरती प्रभू यांचा जीवनप्रवास अतिशय जवळून पहिला. त्यांच्या गावात येण्याचे भाग्य मला मिळाले. साहित्यिकमधील प्रचंड श्रीमंती त्याचाकडे होती. आरती प्रभू या साहित्यातील हिरा होते. नट हा नाशवंत माल आहे. कार्यरत असताना त्याला महत्त्व दिले जात नाही. प्रभू हे व्यक्तीमत्व फार मोठे होते.’’

मधू मंगेश कर्णिक म्हणाले,‘‘माझा जिवलग मित्र आरती प्रभूंनी कुडाळला साहित्यातून नावलौकिक मिळवून दिला. कुडाळ नगरीत आम्ही दोघेजण नवोदित म्हणून एकत्र आलो. आरती प्रभू हा केवळ साहित्यवर जगला. खाजगी जीवनात त्यांना दारिद्र या गोष्टीला सामोरे जावे लागले. प्रभूंनी आपले आयुष्य कवितांसाठी वेचले.’’

सत्कारमूर्ती केळुस्कर म्हणाले,‘‘आरती प्रभू हे माझे आवडते कवी. त्यांचे नावाने मला मिळालेला पुरस्कार ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. त्यांनी आपल्या कोकणाला कविताच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर नेले.’’

प्रास्तविक आनंद वैद्य, सूत्रसंचालन प्रफुल वालावलकर यांनी केले. हा पुरस्कार डॉ. नेरुरकर यांनी पुरस्कृत केला होता. सोहळ्यानंतर डॉ. केळुस्कर यांनी कविता सादर केल्या.

Web Title: Sindhudurg News Dr Mohan Agashe comment