इस्दाचे प्रमुख डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या गाडीची तोडफोड

 इस्दाचे प्रमुख डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या गाडीची तोडफोड

मालवण - तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसलेल्या ११ स्थानिक कामगारांचे बेमुदत उपोषण तोडगा न निघाल्याने पाचव्या दिवशी सुरूच होते. सात उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. यातच मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उपोषणाच्या ठिकाणी गेलेल्या इस्दाचे प्रमुख डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या गाडीच्या काचा अज्ञाताने फोडल्यामुळे वेगळे वळण लागले.

तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या ११ सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संबंधित कंत्राटदाराने तडकाफडकी कामावरून कमी केले. याप्रकरणी कामगारांनी माजी सरपंच डॉ. जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारीपासून तारकर्ली पर्यटन केंद्रासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणात स्नेहा केरकर, अजित गोसावी, देवेंद्र मयेकर, धोंडी केळुसकर, जॉर्ज फर्नांडिस, कुणाल बापर्डेकर, संजीव केळुसकर, सागर करंगुटकर, नंदू जोशी, महेश सावंत, अक्षय भगत, धीरज भगत आदी सहभागी झाले आहेत. 

डॉ. केरकर म्हणाले, ‘‘एमटीडीसी प्रशासनाने आमच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांपैकी कामगारांचे थकीत पगार उद्यापर्यंत जमा होणार आहेत; परंतु ११ कामगारांना सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’’

यावेळी भाई मांजरेकर यांनी उपोषणकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा एमटीडीसी प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप केला. 
उपोषणकर्त्या सातजणांची प्रकृती बिघडली आहे. आज सायंकाळी डॉ. केरकर यांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले होते. आज उपोषणकर्त्यांनी एमटीडीसी पर्यटक निवासाचे व्यवस्थापक एस. ए. कांबळे, जिल्हा पर्यटन प्रकल्प अधिकारी दीपक माने, एमटीडीसीचे अधिकारी चव्हाण यांच्या नावाने एमटीडीसीच्या प्रवेशद्वारासमोर पिंडदान घालून अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान डॉ. सारंग कुलकर्णी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी डॉ. कुलकर्णी यांच्या गाडीच्या काचा अज्ञातांनी फोडल्या; मात्र याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

याबाबत डॉ. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझी गाडी फोडण्याचा झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. याची तक्रार मी पोलिस ठाण्यात दिलेली नाही. या प्रकारासंदर्भात उपोषणकर्त्यांविषयी माझी कोणतीही तक्रारही नाही. गाडीच्या काचा फोडण्याचे कृत्य हे अज्ञाताने केले आहे. आपण सिंधुदुर्गात केलेल्या कामाची अशाप्रकारे पोचपावती मिळाली, त्याचे आभार मानले पाहिजेत अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. या प्रकारामुळे सिंधुदुर्गात काम करायचे की नाही? असा प्रश्‍न मला पडला आहे असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com