कोकणसाठी स्वायत्त उपविद्यापीठे स्थापन व्हावीत - डॉ. विनायक दळवी

भूषण आरोसकर
बुधवार, 10 जानेवारी 2018

स्थानिक रोजगार निर्मितीस स्वायत्त उपविद्यापीठाची ही संकल्पना नक्की यशस्वी ठरू शकते, असे मत राज्यपालांचे माजी उपसचिव तथा मुंबई विद्यापीठाचे परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक दळवी यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी - स्वायत्त महाविद्यालयाच्या धर्तीवर शैक्षणिक विकेंद्रीकरण करून उपविद्यापीठे (उपकेंद्रे नव्हे) जिल्ह्यात स्थापन होण्याची गरज आहे. तसे झाले तरच स्थानिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक उपक्रम व अभ्यासक्रम राबविले जातील व डिग्री मात्र मुंबई विद्यापीठाचीच मिळेल. स्थानिक रोजगार निर्मितीस स्वायत्त उपविद्यापीठाची ही संकल्पना नक्की यशस्वी ठरू शकते, असे मत राज्यपालांचे माजी उपसचिव तथा मुंबई विद्यापीठाचे परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक दळवी यांनी व्यक्त केले.

येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीत झालेला घोळ विचारात घेता आपल्या भाषणात विद्यापीठाच्या विकेंद्रीकरणाचा मुद्दा मांडला. यावर कार्यक्रम झाल्यानंतर या मुद्यावर त्यांनी आपली व्यापक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे सोमय्या, रुईया, सेंट झेवियर ही महाविद्यालये, संस्था स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवितात; मात्र त्यांना मुंबई विद्यापीठाचीच पदवी दिली जाते. तशी या ठिकाणीही उपविद्यापीठाची संकल्पना ही गैर नाही.

मुंबई विद्यापीठ हे मुंबईला असल्याने काही महत्त्वाच्या प्रकियेसाठी मुंबईला जावे लागते. यात एवढ्या लांबचा पल्ला गाठताना विद्यार्थ्यांचे हाल होतात. रत्नागिरीला उपकेंद्र होते. ते सक्षम व्हायला हवे होते. त्याठिकाणचे उपकेंद्र झारापला स्थापन करायचे होते. त्यासाठी झारापला जमीनही मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्याला सोलापूर विद्यापीठ असे स्वतंत्र विद्यापीठ मिळाले आहे; मात्र आपल्या कोकणातील ७ जिल्हे व त्यातील ७५० महाविद्यालये आहेत. त्यामुळे अनेक समस्या जाणवतात. रत्नागिरीला टुरिझम मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू केला होता. तेथे कृषी फलोद्यान, मत्स्य उत्पादन या दोघाचींही प्रक्रिया या संदर्भात प्रशिक्षण देऊन पायाभूत सुविधा उभ्या करता आल्यास तेथे स्थानिक रोजगार निर्माण करता आला असता. पंतप्रधानांनी कौशल्याधििष्ठत उद्योग प्रक्रिया उपक्रम जाहीर केला; पण पुढे काय असा सवाल निर्माण झाला आहे.’’

शेतकरी विचित्र स्थितीत सापडलाय...
कृषी संदर्भात बोलताना सांगितले की,‘‘ शेतकऱ्यांचा आजचा रासायनिक खतांचा वापर पाहता जमिनीचा कस खचला गेला आहे. याचबरोबर कुटुंबाच्या वाढीसोबत जमिनीचेही तुकडे होत गेले. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस कमी कमी होत गेले आहे. अशा विचित्र स्थितीत आजचा शेतकरी सापडला आहे.’’

Web Title: Sindhudurg News Dr. Vinayak Dalavi comment