दुरांतो अपघाताची चौकशी पूर्ण

अमोल टेंबकर
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी -  दुरांतो एक्‍स्प्रेसच्या अपघाताची चौकशी दुसऱ्या दिवशी संपली. बंद खोलीत जबाब नोंदविण्यात आले; मात्र अपघातावेळी गलथानपणा दाखविणाऱ्या कामगारांनी पलायन केले असून चौकशीसाठी वेगळेच लोक समोर आणल्याची चर्चा सुरू होती.

सावंतवाडी -  दुरांतो एक्‍स्प्रेसच्या अपघाताची चौकशी दुसऱ्या दिवशी संपली. बंद खोलीत जबाब नोंदविण्यात आले; मात्र अपघातावेळी गलथानपणा दाखविणाऱ्या कामगारांनी पलायन केले असून चौकशीसाठी वेगळेच लोक समोर आणल्याची चर्चा सुरू होती.

मडगाव ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या दुरांतो एक्‍स्प्रेसला नेमळे-पाटकरवाडी येथे गुरुवारी (ता. २६) अपघात झाला होता. ट्रॅकवर नव्याने घालण्यात येणारा रुळ रंगविण्यासाठी ठेवण्यात आल्याने अपघात घडला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. दरम्यान, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार काल सकाळी चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांचे पथक या ठिकाणी दाखल झाले. आज दुपारपर्यंत चौकशीची प्रक्रिया सुरू होती. काहींचे जबाब नोंदविले गेले.

दरम्यान, याबाबत चर्चेला उत आला आहे. हा अपघात ज्या कामगारांच्या निष्काळजीपणामुळे घडला ते लगेचच पळून गेले. चौकशी समितीसमोर आणलेले कामगार वेगळेच असल्याची चर्चा आज सुरू होती. काल रात्री साडेअकरापर्यंत संबंधित कामगारांची चौकशी करण्यात आली. आज सकाळी अन्य कामगार आणि रेल्वेचे चालक बी. सी. सुधाकर, ट्रॅकमन दिनेश म्हाडेश्‍वर यांचे जबाब घेण्यात आले. 

या बाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी रेल्वेच्या संबंधित चौकशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की चौकशीची प्रक्रिया ही बंद खोलीत घेण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी नेमके काय उघड झाले, हे चौकशी समितीच सांगू शकते. दुसरेच कामगार चौकशीसाठी पुढे आणले असल्यास समिती आपल्या अहवालात निश्‍चितच त्याची दखल घेईल.

Web Title: sindhudurg news Durato Express accident enquiry