बांदा परिसराला आवाजासह हादरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

बांदा - परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक भूकंपासारखा हादरा बसला. काही ठिकाणी आवाजही ऐकू आला. हा नेमका प्रकार कशामुळे घडला याचे गूढ उशिरापर्यंत कायम होते. हा प्रकार सायंकाळी ७.५० वाजता घडला.

बांदा - परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक भूकंपासारखा हादरा बसला. काही ठिकाणी आवाजही ऐकू आला. हा नेमका प्रकार कशामुळे घडला याचे गूढ उशिरापर्यंत कायम होते. हा प्रकार सायंकाळी ७.५० वाजता घडला.

परिसरात सायंकाळी अचानक हादरा जाणवला. बांदा परिसरात याची तीव्रता कमी होती. विलवडे भागात मात्र घरातील भांडीही वाजली. कोनशी भालावल भागातही हा धक्का जाणवला. असनिये परिसरात या धक्‍क्‍यामुळे घराचे पत्रे हादरल्याचे जाणवले. काही ठिकाणी घाबरुन रहिवासी घराच्या बाहेर पडले. काही ठिकाणी अस्पष्ट स्फोटाचा आवाजही आला.

हा नेमका भूकंपाचा हादरा की कशाचा याबाबत गूढ निर्माण झाले आहे. वर्ष-दीड वर्षांपूर्वी इन्सुली परिसरातही असा प्रकार घडला होता. याचे गूढही उकलता आले नव्हते. एखाद्या सुरुंगस्फोटामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे; मात्र इतक्‍या मोठ्या शक्तीने स्फोट करण्यासारखा प्रकल्प किंवा काम या भागात सुरू नाही. याची तीव्रता तांबोळी, कोनशीमध्ये जास्त जाणवली.

याबाबत जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडल्याच्या सूचना किंवा नोंदी नसल्याचे सांगण्यात आले. दोडामार्ग तालुक्‍यात तिलारी धरणाची भूकंपमापक यंत्रणा बंद आहे. त्यामुळे तेथूनही याबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस
सिंधुदुर्गात वातावरणातील बदल आज अधिक तीव्रतेने जाणवले. दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी याची तीव्रता जास्त होती. सावंतवाडी परिसरात तर रस्ते ओले होण्याइतकी पावसाची रिपरिप झाली.

Web Title: Sindhudurg News earthquake in Banda region