दोडामार्ग तालुक्यात सोनावलमध्ये हत्तीचा धुडगूस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

दोडामार्ग - वीजघर बांबर्डे परिसरातील टस्करापाठोपाठ आता सोनावलमध्ये नवा हत्ती दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री त्याने सोनावलमध्ये माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास व न्याहरीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली.

दोडामार्ग - वीजघर बांबर्डे परिसरातील टस्करापाठोपाठ आता सोनावलमध्ये नवा हत्ती दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री त्याने सोनावलमध्ये माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास व न्याहरीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली. त्यानंतर धनगरवाडीत धुडगूस सुरू असताना त्याला हाकलवण्यासाठी आलेल्या चौंडू पाटील यांचा त्याने पाठलाग केला. दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.

सोनावल परिसरात हिरवीगार भातशेती तरारून आली आहे. अेनक शेतकऱ्यांनी वायंगणी शेती केली आहे. त्या शेतीत हत्तीने धुडगूस घातला. भातशेती तुडवून नुकसान केले. कुळीथ पिकांचेही नुकसान केले. चंदगड तालुक्‍यातील नामखोल गावातून सोनावळकडे येणाऱ्या भातीच्या रस्त्याने तो आला. पहिल्यांदा दहा साडेदहाच्या दरम्यान तो मॅग्डेलिना इकोलासो यांच्या खासगी बागेतील वन हर्ष नावाच्या निवास व न्याहरीसाठीच्या रेस्ट हाऊस समोरील सौरऊर्जा कुंपण उद्ध्वस्त करून बागेत शिरला. तेथे त्याने घड आलेल्या केळी जमीनदोस्त केल्या.

केळीचा गाभा फस्त करून तो पुढे सरकला. यावेळी तो वीज खांबाजवळून चिंचोळ्या वाटेने दुसऱ्या केळीच्या बनात शिरला. तेथेही नुकसान केले आणि त्याच बागेतील माड जमीनदोस्त करून धनगरवाड्यावरील वस्तीत शिरला. तेथील लक्ष्मी वरक यांच्या घरामागच्या केळी त्याने जमीनदोस्त केल्या. वेळ साधारण पहाटे तीनची होती. कुत्र्यांच्या आवाजाने लक्ष्मी वरक, बाबू बोडेकर, चौडू पाटील घरातून बाहेर आले. सुरवातीला त्यांना गवा आला असेल असे वाटले. म्हणून पाटील यांनी दांडा घेऊन आरडाओरड करत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; हत्तीनेही झटकन वळत पाटील यांचा पाठलाग केला. पाटील, बोडेकर यांनी पळ काढला. हत्ती नामखोलहून आलेला मातीचा रस्ता पार करून बोडेकर यांच्या अंगणात कुंपण पार करून थांबला, अन्यथा अनर्थ घडू शकला असता.

हत्तीने तेथील लिंगाजी गवस यांच्या कुळीथ आणि केळी बागेचे, आप्पा नारायण गवस, देविदास गवस, नारायण गवस यांच्या भातपिकांचे नुकसान केले. लक्ष्मी वरक यांच्या माड आणि केळीचेही त्याने नुकसान केले. तेरवण मेढे सरपंच प्रवीण गवस, सदस्य सगुण गवस, शिवराम गवस यांनी नुकसानीची पाहणी केली. वनपाल दत्ताराम देसाई, गणेश लोकरे, वनरक्षक अनंत देसाई यांनी पंचनामा केला.

दरम्यान, गावकरी विश्‍वनाथ गवाळकर आणि विजय गवाळकर यांनी मागच्या वेळेच्या पहिल्यांदा एक हत्ती आला, त्यानंतर पाच हत्ती आले. त्यांचा येण्याचा मार्गही हाच होता असे सांगून भविष्यातील पाच हत्तीच्या संकटाची टांगती तलवार आपल्यावर असल्याचे सांगितले.

‘तो’ हत्ती नव्याने दाखल 
सोनावलमध्ये रात्री दाखल झालेला हत्ती वीजघर बांबरडे परिसरातील नव्हे, तर तो नव्याने दाखल झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील नामखोल मधून तो सोनावलमध्ये घाटरस्त्याने उतरला. बांबर्डे परिसरात पूर्वीच्या हत्तीने रात्री सिद्धेश राणे यांच्या १०० केळी उद्ध्वस्त केल्या. शिवाय दोन्ही हत्तींच्या पायाची मापे वेगवेगळी असल्याने आणखी एक हत्ती तिलारी खोऱ्यात दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे. बांबर्डेतील हत्तीने केरळीयनांच्या कुंपणाचेही रात्री मोठे नुकसान केले.

सौरकुंपण, गेट निष्पभ्र
सोनावलमध्ये प्रवेश केलेल्या हत्तीने विद्युतभारित सौरकुंपण उद्ध्वस्त केले, शिवाय ‘वन हर्ष’ मधून बाहेर पडताना बंद लोखंडी गेटही धक्‍का मारून सताड उघडत तो पसार झाला, त्यामुळे सौरउर्जा कुंपणही हत्तीसमोर निष्पभ्र असल्याचे स्पष्ट झाले. बंद लोखंडी गेटही त्याला रोखू शकले नाही. त्यामुळे हत्तीला रोखणे अथवा हुसकावणे किती कठीण आहे याची कल्पना येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Elephant in Sonaval Dodamarg Taluka