उद्योजकांना दिलेले भूखंड परत घेणे अन्यायच - उपजिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कुडाळ -‘उद्योजकांना वितरित करण्यात आलेले भूखंड औद्योगिक महामंडळाने परत मागविणे हे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. याबाबत उद्योजकांना न्याय दिला जाईल,’ असे आश्‍वासन उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी उद्योजकांच्या बैठकीत येथे दिले.

कुडाळ -‘उद्योजकांना वितरित करण्यात आलेले भूखंड औद्योगिक महामंडळाने परत मागविणे हे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. याबाबत उद्योजकांना न्याय दिला जाईल,’ असे आश्‍वासन उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी उद्योजकांच्या बैठकीत येथे दिले.

या बैठकीला उद्योजकांच्या समस्या, विविध विषयांवर समाधानकारक चर्चा झाली. एमआयडीसीच्या संकुलामध्ये येथील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री. जोशी यांनी बैठक आयोजित केली होती. या वेळी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, एमआयडीसीचे अधिकारी अविनाश रेवणकर, उद्योजक उपस्थित होते.

एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना लीज ट्रान्सफर करताना आकारण्यात येत असणारे मुद्रांक शुल्क अन्यायकारक व अयोग्य आहे. यासाठी मुद्रांक अधिकारी व असोसिएशन यांची संयुक्त चर्चा घडवून योग्य मार्ग काढण्याचे ठरले. डेप्यूटी इंजिनीअर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रबंधक यांनी उद्योजकांची प्रशासकीय कामे कुुडाळ येथे पूर्ण करावीत असे सुचविले. जोशी यांनी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.

एमआयडीसी परिसरातील गेल्या वीस वर्षांतील रस्त्यांची दुर्दशाही अधिकारी व कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. हे निदर्शनास आणताच संबंधितांवर त्वरित कारवाई केली जाईल. येत्या आठ दिवसांत रस्त्यावरील खडी साफ करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले जातील. परिसरातील स्ट्रीटलाईट दोन महिन्यांपासून बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. याबाबत अधीक्षक अभियंता पाटील यांनी प्रलंबित जोडणी त्वरित केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

Web Title: sindhudurg news Entrepreneur meeting with Deputy Collector