सिंधुदुर्गातील आंबा जोडला जाणार थेट ग्राहकांशी

संतोष कुळकर्णी
बुधवार, 3 जानेवारी 2018

देवगड - शासनाच्या समूह विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आंबा बागायतदार तसेच अन्य फळ प्रक्रिया उद्योजकांच्या उत्कर्षासाठी संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘देवगड अल्फान्सो मॅंगो अँड मल्टिफ्रुट असोसिएशन’ कंपनीची स्थापना झाली असून, लवकरच शासनाला अभिप्रेत असलेली शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था विस्तारली जाणार आहे.

देवगड - शासनाच्या समूह विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आंबा बागायतदार तसेच अन्य फळ प्रक्रिया उद्योजकांच्या उत्कर्षासाठी संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘देवगड अल्फान्सो मॅंगो अँड मल्टिफ्रुट असोसिएशन’ कंपनीची स्थापना झाली असून, लवकरच शासनाला अभिप्रेत असलेली शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था विस्तारली जाणार आहे. यातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती साधण्यास मोठा वाव आहे. यासाठी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

राज्य शासनाने सूक्ष्म व लघुउत्पादकांना बळ देण्यासाठी समूह विकास योजना तयार केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील आंबा बागायतदार व फळप्रक्रिया उद्योजकांच्या उत्कर्षासाठी ‘देवगड अल्फान्सो मॅंगो अँड मल्टिफ्रुट असोसिएशन’ या कंपनीची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योजकांच्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी समाईक सुविधा केंद्र निर्माण करणे. केंद्रामार्फत फळे तसेच अन्य शेती उत्पादनावर वाजवी किमतीमध्ये प्रगत नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक उच्चदर्जाची मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करून त्याची विक्री व्यवस्था उभारणे तसेच उत्पादित मालाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न करणे हा केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. केंद्रामध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया सुविधांचा अंतर्भाव आहे.

शासनाच्या समुह विकास कार्यक्रमांतर्गत उभारल्या जाणाऱ्या केंद्राचा तालुक्‍यातील आंबा बागायतदार तसेच अन्य फळ उत्पादकांना निश्‍चितच लाभ होईल. यामुळे एकाचवेळी तयार होणाऱ्या आंब्यावर प्रक्रिया करून त्यापासून उत्पादने घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येईल. चालू हंगामापासूनच याला सुरूवात होईल.
- श्रीधर ओगले, 

बागायतदार तथा प्रक्रिया उत्पादक

छोट्या प्रक्रिया उद्योजकांचा काही प्रमाणात प्रक्रिया झालेला माल केंद्रावर एकत्रित करून त्यावर प्रक्रिया  करून त्याचे आकर्षक पॅकिंग करून तो पुन्हा उत्पादकांकडे पाठवला जाईल. त्यानंतर पुन्हा उत्पादकांकडील तयार उत्पादने दुसऱ्या कंपनीकडून एकत्रित करून त्याद्वारे ग्राहकांना पोचवली जातील. यामध्ये उत्पादक ते ग्राहक जोडले जातील, अशी यंत्रणा उभारली जाणार आहे. विविध सुमारे शंभर प्रक्रिया उत्पादने घेतली जाण्याची यामध्ये सोय आहे. 

शासनाच्या समूह विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र उभारणीसाठीचे सुमारे ८० टक्‍के अनुदान शासनाकडून उपलब्ध होणार असून, २० टक्‍के निधी फळप्रक्रिया उत्पादकांचा राहणार आहे. या केंद्रासाठी तालुक्‍यातील दाभोळे येथे भाडे करारावर जागा उपलब्ध करून काम सुरू झाले आहे. येत्या आंबा हंगामापासून केंद्र कार्यान्वित करण्याचा कंपनीचा मानस आहे.

सचिन देवधर आणि दिनेश बर्वे केंद्राचे संचालक आहेत. सुमारे दोनशे टन विविध फळांवर प्रक्रीया करण्याची केंद्राची क्षमता आहे. या सुविधा केंद्राचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या फळावर उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने मुल्यवर्धन करणे शक्‍य होईल. फळांना चांगला दर मिळेल तसेच प्रक्रिया होऊन आर्थिक प्रगती साधता येईल. देवगडबरोबरच सावंतवाडीला लाकडी खेळणी, मालवण व वेंगुर्लेत काजू तर कुडाळला बांबूवरील प्रक्रीया उत्पादन केंद्र उभारण्याचे धोरण आहे. 

Web Title: sindhudurg news Establishment of 'Devgad Alphonso Mango and Multifruit Association' Company