सिंधुदुर्गातील डिंगणेत ३५० एकर बागायती खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

बांदा - डिंगणे धनगरवाडी परिसरात माळरानावरील काजू बागायतीमध्ये मंगळवारी सकाळपासून आगडोंब उसळल्याने सुमारे ३५० एकरांहून अधिक क्षेत्रातील बागायती जळून खाक झाली. यामुळे झालेले नुकसान कोटीच्या घरात आहे.

बांदा - डिंगणे धनगरवाडी परिसरात माळरानावरील काजू बागायतीमध्ये मंगळवारी सकाळपासून आगडोंब उसळल्याने सुमारे ३५० एकरांहून अधिक क्षेत्रातील बागायती जळून खाक झाली. यामुळे झालेले नुकसान कोटीच्या घरात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्‍यात आणण्यासाठी डेगवे, डिंगणे, गाळेल, मोरगाव गावातील शेकडो शेतकरी ग्रामस्थ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. वेंगुर्ले पालिकेचा बंब उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

डिंगणे धनगरवाडीत लागलेली आग मोरगाव, डेगवे गावच्या सीमेपर्यंत पोचल्याने मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजू हंगामातच शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या आपत्तीने अनेकांचे डोळे पाणावले होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास डिंगणे धनगरवाडी परिसरात आगीचे लोळ ग्रामस्थांच्या निदर्शनास पडले. काजू बागायती साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ होते. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. बांदा पोलिसांना ग्रामस्थांनी फोनवरून आगीची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ सावंतवाडी पालिकेला याबाबतची माहिती देऊन घटनास्थळी मदतकार्यात सहभाग घेतला.सावंतवाडी पालिकेचा बंब नेहमीप्रमाणेच नादुरुस्त असल्याने तो निकामी ठरला. त्यामुळे वेंगुर्ले पालिकेच्या बंबाला पाचारण करण्यात आले. बंब दुपारी उशिराने दाखल झाल्याने उद्विग्न शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. डिंगणे धनगरवाडीत लागलेली आग मोरगाव, डेगवे गावाच्या सीमेपर्यंत पोचली होती. डिंगणेसह गाळेल, मोरगाव, डेगवे, फकिरफाटा येथील शेकडो शेतकरी ग्रामस्थ आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. आबालवृद्धांसह महिलांचाही यात मोठा समावेश होता; मात्र बागायतीमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने आग आटोक्‍यात येत नव्हती.

प्राथमिक पाहणीनुसार डिंगणे येथील एकनाथ सावंत, सुबोध सावंत, महादेव सावंत, विलास सावंत, संतोष सावंत, भास्कर सावंत, नितीन सावंत, शशिकांत पोखरे, महेश पोखरे, अवधूत शिरोडकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जळाल्या आहेत. ३५० एकरहून अधिक क्षेत्रांत आग लागून नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात जाण्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. आगीच्या धुराचे लोट बांदा शहरापर्यंत निदर्शनास येत होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. येथील पोलिस सुहास राणे व वाहनचालक कासले यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

बांद्यात अग्निशमन बंबाची मागणी
जिल्ह्यात सर्वाधिक काजू बागायती बांदा परिसरात आहे. हजारो एकर क्षेत्रांत काजू बागायती आहेत. किंबहुना या भागातील ग्रामस्थांची आर्थिक नाडी याच बागायतीवर अवलंबून आहे. दरवर्षी या भागात शॉर्टसर्किट व अन्य कारणांमुळे काजू बागायतींना आग लागण्याचे प्रकार होत असतात. पंचनामा करण्याचे सोपस्कार करण्यात आले. तरीही शासनाकडून नुकसानबाधित शेतकऱ्यांना एक रुपयाची सुद्धा मदत करण्यात येत नाही. बांदा परिसरात लागलेल्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी बांदा शहरात अग्निशमन बंब असण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गतवर्षीच्या आगीच्या नुकसानीला उजाळा
गेल्यावर्षीही याच परिसरात शेकडो एकर काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. धनगरवाडीतील बाळू शिंदे, कृष्णा शिंदे, रामदास शिंदे, लक्ष्मण शिंदे यांच्या मालकीच्या बकऱ्यांच्या गोठ्याला आग लागून ९५ बकऱ्या जळून कोळसा झाल्या होत्या. त्या प्रसंगाची आठवण आजही स्थानिकांच्या मनात कायम असल्याचे आज दिसून आले.

Web Title: Sindhudurg News Fire on 350 acres in Dingane