सावंतवाडीत ऐतिहासिक वास्तूला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

अज्ञाताने ही आग लावली आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती आत जाताना व बाहेर येताना दिसत आहे. आज हे फुटेज उपलब्ध होईल. याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष, सावंतवाडी

सावंतवाडी - येथील संस्थानकालीन काझी शहाबुद्दीन हॉल या हेरिटेज इमारतीला अज्ञाताने आग लावल्याचा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारात या ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले. याबाबतची तक्रार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांत दिली. आग लावणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज आज (ता. ३०) उपलब्ध होणार असल्याची माहिती श्री. साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडी संस्थानची राजधानी असलेल्या शहरात काही ऐतिहासिक वास्तू आहेत. यात प्रांत कार्यालयासमोरील या सभागृहाचा समावेश होतो. आज दुपारी अडीचच्या दरम्यान या इमारतीला आगीच्या ज्वालांनी वेढले. ही आग अज्ञाताने मुद्दामहूम लावल्याचा संशय आहे. या प्रकाराने खळबळ उडाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दीड तासाने ही आग आटोक्‍यात आणली. 

प्रांत कार्यालयासमोरून जाणाऱ्या सदाशिव परब या व्यक्तीला या जीर्ण इमारतीच्या छपरावरून धूर येत असल्याचे दिसून आले. त्याने याबाबतची माहिती तत्काळ पालिका, प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, तहसील कार्यालयाला दिली. शेजारी असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही याची माहिती पालिका व इतर कार्यालयांना दिली. पालिकेजवळ बंब नसल्याने घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी पाण्याच्या टॅंकरसह शिडी घेऊन दाखल झाले. या वेळी इमारतीजवळ नागरिकांची मोठी गर्दी झाली. या इमारतीत स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर विकत घेतलेली साडेतीन लाखांची प्लास्टिक क्रशिंग मशिन ठेवली होती.

आगीने इमारतीच्या डाव्या बाजूच्या छपराकडे कब्जा केला होता. त्यामुळे छपर कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीतही पालिकेच्या कर्मचाऱ्यानी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून खालील बाजूची आग विझवून दोन भागांतील दोन टनची मशिन बाहेर काढली. यात पालिका कर्मचारी जयंत जाधव, आंबेरकर, प्रवीण कांबळे, शंकर आसोलकर, अमर कांबळे, तुळशीदास नाईक, गणेश खोरागडे, सुभाष बिरोडकर आदीनी मोठे प्रयत्न केले. या वेळी माहिती मिळताच नगराध्यक्ष बबन साळगावकर, अभियंता तानाजी पालव व नगरसेवक दाखल झाले. 

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांसह उपअभियंता अतुल पाटील दाखल झाले. आपत्ती यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही. व्हॉट्‌सॲपवरील मेसेज पाहून आपण याठिकाणी ताबडतोब दाखल झालो असल्याचे या वेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. सुमारे अर्ध्या तासाने याठिकाणी पोलिस कर्मचारी दाखल झाले. आतील कागदाच्या जुन्या रद्दीला मोठ्या प्रमाणात आगीने घेरले होते; तर ही आग या इमारतीच्या डाव्या बाजूकडील छताकडे वाढत गेली होती.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे बंब नसल्याने पाण्याच्या टॅंकरला पाण्याने व शिडीचा वापर करून आग आटोक्‍यात आणली. दरम्यान, या वेळी त्याची मोठ्या प्रमाणात दमछाक होत होती. दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आणण्यात आली. या इमारतीत वीजप्रवाह नसल्याने शॉर्टसर्किटचा प्रश्‍नच नसल्याचे या वेळी श्री. साळगावकर यांनी सांगितले, तसेच ही आग जाणूनबुजून लावल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला. या घटनेची माहिती पालिकेकडून सुपरवायझर विनोद सावंत यांनी येथील पोलिस ठाण्याला दिली.

ऐतिहासिक इमारत
हे सभागृह श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या कार्यकालात बांधण्यात आले. बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे दिवाण काझी शहाबुद्दीन यांचे नाव या सभागृहाला देण्यात आले होते. ते मूळचे सावंतवाडीतील. त्यांनी बापूसाहेब महाराजांच्या कार्यकालात सावंतवाडीत अनेक विकासात्मक कामे केली. जिमखाना येथील पॅव्हेलियन हे त्यांच्याच प्रेरणेतून उभे राहिले.  लग्न सोहळे, बॅडमिंटन, राजकीय बैठका, सभा असे कार्यक्रम येथे होत असत. काझी शहाबुद्दीनची ही इमारत पालिकेकडे वर्ग केली होती.

नूतनीकरणासाठी टेंडर
या इमारतीच्या नूतनीकरणासाठी २० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. हे कोल्हापूर येथील निकम ॲण्ड निकम या कंपनीने घेतले. काही दिवसांत त्याचे नूतनीकरण करून ती पुनर्वापरासाठी आणण्यात येणार होती. अशी माहिती नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली. 

Web Title: Sindhudurg News fire to historic Kazhi Shahabudieen hall