पडवे, मोरगावात अग्नितांडव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

दोडामार्ग - पडवे आणि मोरगाव परिसरात आज दुपारी अग्नितांडवामुळे चार हजारांहून अधिक काजू कलमे जळून भस्मसात झाली. हातातोंडाशी आलेल्या काजू बागा जळाल्याने शेतकरी घायकुतीला आले आहेत. विद्युत रोहित्रातून ठिणगी पडल्याने आग लागल्याचा संशय व्यक्‍त होत आहे.

दोडामार्ग - पडवे आणि मोरगाव परिसरात आज दुपारी अग्नितांडवामुळे चार हजारांहून अधिक काजू कलमे जळून भस्मसात झाली. हातातोंडाशी आलेल्या काजू बागा जळाल्याने शेतकरी घायकुतीला आले आहेत. विद्युत रोहित्रातून ठिणगी पडल्याने आग लागल्याचा संशय व्यक्‍त होत आहे.

बांदा-दोडामार्ग मार्गावर डेगवे हाताकडून एक रस्ता पडवे भाजगाव मार्गे तळकटकडे जातो, तर दुसरा मार्ग मोरगाव मार्गे दोडामार्गकडे जातो. या दोन्ही रस्त्यांच्या मधल्या भागात कित्येक एकरवर आंबा, काजू, नारळ यांच्या बागा आहेत.

पडवे येथील पुंडलिक देसाई (बाबाजी देसाई, वसंत देसाई, निळकंठ देसाई यांच्या सुमारे वीस-पंचवीस एकरांत हजारो काजू कलमे आहेत. तर मोरगाव हद्दीत दोडामार्ग रस्त्याला अनिल ठाकूर यांचे घर आणि आंबा, नारळ, काजूची बाग आहे. दुपारी अकरा ते दोन या वेळेत अचानक आग लागली. वणवा सगळीकडे पसरत गेला. पुंडलिक देसाई आपल्या मुलीच्या गोड जेवणासाठी कणकवलीला आपले भाऊ आणि नातेवाईकांसोबत गेले होते.

तेथे त्यांना काजूबागेला आग लागल्याची माहिती देण्यात आली. ते तातडीने पडवेत पोचले. तोपर्यंत चार साडेचार हजार कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली होती. काजू बागेतील जळालेली कलमे पाहून त्यांना शोक अनावर झाला. आग पडवे मोगरावच्या सीमेवरील ट्रान्फॉर्मरमुळे (वीज रोहित्रामुळे) लागली असण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली. काही दिवसांपूर्वी हाताकडच्या ट्रान्स्फॉर्मवर स्पार्किंग होऊन आग लागल्याचेही त्यांनी सांगितले.

मोरगाव येथील अनिल ठाकूर यांच्या बागेत ही आग पोचली. त्यांचे जवळपास ५० माड होरपळले. आंब्यावी दहा कलमे जळाली. तर जुनी काजूची सुमारे दहा झाडे जळाली. शिवाय पाईपलाईनसाठी आणलेले पाईप जळाले, घराच्या खिडक्‍या व स्लायडिंगचेही मोठे नुकसान झाले. सावंतवाडीतून येत त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांना राजन ठाकूर, विलास कदम, सत्यवान नाईक, प्रकाश पवार, दीपक पवार आदींनी मदत केली. तर श्री. देसाई व नाईक यांच्या काजू कलमातील आग विझविण्यासाठी पडवे आणि माजगाव येथील गावकऱ्यांनी मेहनत घेतली. दरम्यान, महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला. पंचनामा झाला असला तरी त्यांना नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

आयुष्यभराचा आधार खाक
बांदा - या परिसरात काजू बागायतीवर अवलंबून कुटुंबांची संख्या मोठी आहे. दर चांगला असल्याने यंदा शेतकऱ्यांनी कीटकनाशके व साफसफाईवर मोठा खर्च केला होता; मात्र या आगीत त्यांचा आयुष्यभराचा उत्पन्नाचा आधार खाक झाला. एकट्या पडवे माजगावमध्ये सुमारे अडीच हजार काजू कलमे व उर्वरित मोरगावमधील कलमे खाक झाली. शासकीय पाहणीनुसार नुकसानाचा आकडा दहा लाखाच्या घरात आहे; मात्र प्रत्यक्षात या पेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान झाले आहे.

Web Title: Sindhudurg News fire in Padave, Morgaon