फोंडाघाटमधील चौघे रेल्वेच्या धडकेत ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

कणकवली - मुंबई येथील बोरिवली स्थानकात रूळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने फोंडाघाट-कुर्ली वसाहत येथील एकाच कुटुंबातील चार तरुणांचा मृत्यू झाला. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान ही घटना घडली. 

कणकवली - मुंबई येथील बोरिवली स्थानकात रूळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने फोंडाघाट-कुर्ली वसाहत येथील एकाच कुटुंबातील चार तरुणांचा मृत्यू झाला. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान ही घटना घडली. 

सागर संपत चव्हाण (वय २३), साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७), मनोज दीपक चव्हाण (१७) आणि दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (२०) अशी या चौघांची नावे आहेत. यांतील साईप्रसाद व दत्तप्रसाद सख्खे भाऊ आहेत. सागर कांदिवली पोईसर येथे नोकरीनिमित्त राहायचा. मनोज, दत्तप्रसाद आणि साईप्रसाद रविवारी कणकवलीहून शताब्दी एक्‍स्प्रेसने दादरला उतरले. लोकलने ते बोरिवलीला जात होते. त्यांना न्यायला सागरही आला होता.

कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान लोकल थांबल्याने त्यांनी बाहेर उड्या मारल्या. घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना त्यांना चर्चगेट लोकलने धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद आहे. सहायक पोलिस निरीक्षक आर. जे. भिसे तपास करत आहेत. चौघांचेही मृतदेह मुंबईहून फोंडाघाट-कुर्ली वसाहत येथे आणले जाणार आहेत. कुर्ली वसाहत स्मशानभूमीत उद्या (ता. १५) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

मुंबई पाहण्याचे निमंत्रण ठरले जीवघेणे
अपघाताची माहिती मिळताच फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दत्तप्रसाद अभियंता होता. मनोज आणि साईप्रसाद यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सागर अलीकडेच फोंडाघाट-कुर्ली वसाहत येथे आपल्या गावी आला होता. त्याने आपल्या भावांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार तिघे भाऊ रविवारी मुंबईला गेले होते. त्यांना रेल्वेतून आपल्या खोलीवर नेण्यासाठी सागर त्यांच्यासोबत होता. मात्र रेल्वे मार्ग ओलांडताना दुर्दैवाने चौघा भावांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची मागणी
अपघातानंतर त्यांचे मृतदेह अस्ताव्यस्त पडले होते. मृतदेह ओळखता आले नाहीत. त्यांच्याकडील एका मोबाईलवरून नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर चौघांची ओळख पटली; मात्र ही घटना कशी घडली, याचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी नातेवाइकांनी केली होती. पोलिसांनी मृतदेह तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले होते. पोलिसांनी हा अपघातच असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Sindhudurg News four Dead in Rail accident in PhondaGhat