सावंतवाडीतील ‘त्या’ भामट्याचा फसवणुकीचा आकडा मोठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सावंतवाडी - फसवणूक प्रकरणी काल (ता. २३) पकडलेल्या ‘त्या’ भामट्याचे अनेक प्रताप पुढे आले आहेत. त्याच्या फसवणुकीचा आकडा वाढत असून, त्याची व्याप्ती कणकवली तालुक्‍यापर्यंत पोचली आहे. तो राहत असलेल्या वागदे आणि सावंतवाडीतील दोन्ही घरांवर पोलिसांनी छापा घातला. मात्र, हाती फारसे काही लागले नाही. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मी बांधकाम विभागात कामाला आहे. तुम्हाला उच्च पदावर नोकरी देतो. एका बड्या नेत्याशी माझे नाते संबंध आहेत, असे सांगून सुनील गावडेने तालुक्‍यातील अनेकांना गंडा घातला. सोनुर्ली येथील गौरेश गावकर यांच्या हुशारीमुळे हा भामटा बुधवारी (ता.२३) ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडला. त्यानंतर अनेक प्रकार उघड झाले. त्याने २० लाख रुपयांपर्यंत युवकांना फसवले आहे. गौरेश गावकर याने आपल्याला साडेसहा लाख रुपयांना फसवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

बॅंक खात्यांची होणार चौकशी 
सुनील गावडेची कोणकोणत्या बॅंकेत खाती आहेत. त्याचा तपास पोलिस करणार आहेत. त्याच्या पाठीमागे कोणी गॉडफादर आहे का? याचाही पोलिस तपास घेत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक योगेश जाधव यांनी त्याच्या वागदे येथील घराची व सावंतवाडीतील खोलीची झडती घेतली; मात्र तेथे काहीच आढळले नाही. वागदेत राहत असलेले घर वडिलोपार्जित असून, तेथे सुनीलच राहत होता. आई-वडील अन्य नातेवाईक दुसरीकडे राहतात. त्यांनी सुनीलबाबत आपला संबंध नाकारला आहे. त्या घराच्या झडतीत पोलिसांना काहीच सापडले नसल्याचे प्रभारी निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

वागदे येथे ग्रामपंचायतीत तो कामाला असताना अपहार केल्याने त्याची कामावरून हकालपट्टी केल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Fraud incidence in sawantwadi