राज्यमार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार - साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - शहराला जोडणाऱ्या कोलगाव ते माजगाव आणि गवळीतिठा ते बुर्डी पूल या दोन्ही राज्यमार्गांच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहे, असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे दिला.

सावंतवाडी - शहराला जोडणाऱ्या कोलगाव ते माजगाव आणि गवळीतिठा ते बुर्डी पूल या दोन्ही राज्यमार्गांच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहे, असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे दिला.

दरम्यान, सावंतवाडी रेल्वेस्टेशनवर फास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करणार आहे, असेही साळगावकर यांनी सांगितले. आज येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, अनारोजीन लोबो, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते. 

साळगावकर पुढे म्हणाले, ‘‘शहराला पर्यटनदृष्ट्या महत्वाचे आहे; मात्र गेल्या वर्षात शहराला जोडणाऱ्या कोलगाव ते माजगाव आणि बुर्डी पुल ते गवळीतिठा या दोन्ही राज्यमार्गाची परिस्थिती धोकादायक बनली आहे. रस्ता केल्यानंतर तब्बल सात वर्षे त्याला काही होत नाही; मात्र हे एका वर्षातच खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामात मोठा अपहार झाला आहे. याबाबतची माहिती माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागविण्यात येणार आहे आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी.’’

साळगावकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी रेल्वेस्टेशनवर  फास्ट गाड्या थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे त्याचा फटका येथील नागरीकांना सहन करावा लागत आहे. या गाड्या पकडण्यासाठी कुडाळ किंवा कणकवली येथे जावे लागत आहे. टर्मिनस होऊनही परिस्थिती असेल तर उपयोग काय ? याबाबत योग्य तो निर्णय व्हावा, यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे.’’

जिल्ह्यात बीएसएनएलकडुन दुरसंचारची सेवा पुरविली जात आहे; मात्र गेले महीनाभर या सेवेत मोठा बिघाड आहे. वारंवार लक्ष देवून सुध्दा संबंधित अधिकारी ही सेवा सुरळीत होण्यासाठी लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ सेवा सुधारावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी श्री. साळगावकर यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह बीएसएलएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

गोवा मुख्यमंत्र्यांना भेटणार... 
साळगावकर म्हणाले, ‘‘गोवा बांबूळी येथे आता सशुल्क उपचार देण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा या दोन्ही भागातील संबंध लक्षात घेता यात शिथिलता आणावी, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आपण करणार आहे. त्यासाठी उद्या (ता. १) त्यांची भेट घेणार आहे. जिल्ह्यातील लोकांना शासनाकडून या सेवा देण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण करणार आहे.’’

 

Web Title: Sindhudurg News fraud in state road work