सावंतवाडीतील गांजाप्रकरणी चौघे ताब्यात

अमोल टेंबकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

सावंतवाडी - शहरातील गांजा पार्टीचा प्रकार उघड झाल्यानंतर आज पोलिसांनी या प्रकरणी चौघा युवकांना ताब्यात घेतले. शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात धाव घेत, ‘या प्रकरणाच्या मुळाशी पोचून सूत्रधाराचा शोध घ्या; अन्यथा मंगळवारी (ता. २३) आंदोलन करू’, असा इशारा दिला आहे. 

सावंतवाडी - शहरातील गांजा पार्टीचा प्रकार उघड झाल्यानंतर आज पोलिसांनी या प्रकरणी चौघा युवकांना ताब्यात घेतले.

शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात धाव घेत, ‘या प्रकरणाच्या मुळाशी पोचून सूत्रधाराचा शोध घ्या; अन्यथा मंगळवारी (ता. २३) आंदोलन करू’, असा इशारा दिला आहे. 

अमली पदार्थ पुरविणाऱ्यांची नावे दिली 
लोबो म्हणाल्या, ‘‘झालेला प्रकार भयंकर आहे. मिळाल्यानुसार आज काही संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करावी. सूत्रधारापर्यंत पोहोचा, अशी आमची प्रमुख मागणी आहे; अन्यथा आम्ही मंगळवारी (ता. २३) महिलांना घेऊन पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू.’’

येथील जुनाबाजार परिसरातील चॅपल गल्लीमध्ये रात्री सुरू असणाऱ्या गांजा पार्टीची पोलखोल शिवसेनेच्या नेत्या, तसेच नगरसेवक आनारोजीन लोबो यांनी केली. पोलिसांनी असहकार्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता. पोलिसांनी आज घटनास्थळावर असलेल्या दोघा युवकांसह अन्य दोघा युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यामुळे नेमके या प्रकरणात काय झाले, याची अधिक माहिती मिळू शकली नाही. 
लोबो यांनी येथील प्रभारी पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की संबंधित प्रकार भयंकर आहे. शहरातील युवाईला व्यसनांचा विळखा घालणारा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी. व्यसन कोण करीत होते, यापेक्षा त्यांना ही व्यसने कोण पुरवीत आहे, याच्या खोलापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सूत्रधाराला येत्या दोन ते तीन दिवसांत अटक केलीच पाहिजे. श्री. जाधव यांनी त्यांना सांगितले, की या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संशयितांवर कारवाई करण्यात येईल. 

अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. चौकशीसाठी आज चौघांना आणण्यात आले आहे. त्यात नेमका कोण आहे, याची माहिती घेण्यात येणार आहे. लोबो यांनी आमच्याकडे काही नावे दिली आहेत. त्याची चौकशी करण्यात येणार आहे. कोणाची गय करण्यात येणार नाही.
- योगेश जाधव
, प्रभारी पोलिस निरीक्षक सावंतवाडी

या वेळी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, संघटक रश्‍मी माळवदे, शहरप्रमुख शब्बीर मणीयार, नगरसेवक भारती मोरे, माधुरी वाडकर, रजनी मांडवकर, गृहलक्ष्मी वेंगुर्लेकर, तनुजा सावंत, श्रुतिका दळवी, शिवानी पाटकर, रूपाली मुद्राळे, शैलजा पारकर, मयूरी मुद्राळे, हेलन निब्रे, भारती कासार, विद्या कांदेकर, गीता सुकी, अमित मोर्ये, संजय माजगावकर, शाईस्ता खान आदी उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News Ganja Party Four arrested in Sawantwadi