गांजा पार्टी प्रकरणावरून पोलिसांकडून झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

सावंतवाडी - गांजा पार्टी प्रकरणावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता अखेर आजपासून पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. अमली पदार्थ विकल्याच्या संशयावरून एका दुकानात जात तपासणीही केली; मात्र त्यात काही मिळाले नसल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला.

सावंतवाडी - गांजा पार्टी प्रकरणावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता अखेर आजपासून पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. अमली पदार्थ विकल्याच्या संशयावरून एका दुकानात जात तपासणीही केली; मात्र त्यात काही मिळाले नसल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला.

गांजा पार्टी प्रकरणाला चार दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही सूत्रधारापर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. दुसरीकडे तो गांजा नव्हे, तर तंबाखू पार्टी असा दावा पोलिसांकडून सुरू आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपांचे नाटक रंगले आहे. या पार्श्‍वभूमीवर छापा टाकला. मात्र, त्यात काही संशयास्पद मिळाले नसल्याचा दावा प्रभारी पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांनी केला आहे. येथील जुना बाजार परिसरात उधळण्यात आलेल्या गांजा पार्टीत कोण समाविष्ट झाले होते, याची माहिती नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, त्याच्या आधारे पोलिस खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून पोलिस यंत्रणा टार्गेट होत आहे.

माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज सकाळी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेऊन या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजन राऊळ, बाळू माळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘सिगारेट ओढणाऱ्यांवरही कारवाई होणार’
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अमित गोटे म्हणाले, ‘‘प्रशासनाकडून अमली पदार्थाविरोधात कारवाई कडक केली असून, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.’’

दरम्यान, तेली यांनी भेट घेतल्यानंतर काही तासांनी सावंतवाडीची पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी सायंकाळी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अमोल सरंगले, लक्ष्मण पडकील, सखाराम भोई, योगेश वेगुर्लेकर, रामचंद्र मळगावकर, प्रणाली रासम, सुप्रिया गवस, किरण कांबळी, संतोष दाभोलकर, वसंत देसाई, गुरुदास भागवत, संदीप राठोड आदी कर्मचाऱ्यांनी गांजा विक्रीच्या संशयाने एका दुकानात तपासणी केली. त्या ठिकाणी त्यांना काहीही आढळून आले नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे; मात्र संबंधित दुकानदाराच्या दुकानाची तपासणी करून त्यांची चौकशी करण्यात आली. 

याबाबत प्रभारी निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आमच्या पथकाने येऊन तपासणी केली; मात्र सद्यःस्थितीत त्याच्याकडे काहीही मिळाले नाही. आमची कारवाई सुरूच राहणार आहे. शहरातील नरेंद्र डोंगर, जिमखाना मैदान, महादेव भाटले अशा अनेक ठिकाणी बसणाऱ्या तळीरामांवर आमची कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत चार ते पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गांजा पार्टीच्या प्रकरणात उशिरापर्यंत कोणाला ताब्यात घेण्यात आले नव्हते. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, गांजा पार्टीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील संशयास्पद असलेल्या दुकानांची चौकशी करून झडती घेण्यात आली. चार तरुणांची तपासणी करण्यात आली; मात्र त्यांच्याकडे काहीही आढळून आलेले नाही. ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे. जे संशयित आढळून येतील, त्यांची गय केली जाणार नाही. असे प्रकार आपल्या परिसरात घडत असतील तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, संबंधितांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

Web Title: Sindhudurg News Ganja party issue in Sawantwadi