‘ग्लोबल मालवणी’तर्फे स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मालवण -  येथील ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ‘ग्लोबल मालवणी’ या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये चार टन कचरा गोळा केला.

मालवण -  येथील ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ‘ग्लोबल मालवणी’ या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये चार टन कचरा गोळा केला. विशेष म्हणजे यातील पालापाचोळा, लाकडे आदी प्रकारचा बहुतांश कुजणारा कचरा समुद्रकिनारी खड्डा खोदून त्याची विल्हेवाट लावली. प्लास्टिक, काच व रबरयुक्त कचरा वेगळा गोळा करण्यात आला.

मोहिमेचा प्रारंभ मोरयाचा धोंडा देवस्थान येथून झाला. या वेळी आपल्या निवासस्थानी अंगणातील कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या दांडी येथील जॉर्जी डिसोझा यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार झाला. मोहिमेत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक पंकज सादये, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, गणेश येशू मंडळ गवंडीवाडा तसेच आतू फर्नांडिस, स्थानिक नागरिक आबा चांदेरकर, दीपक जोशी, विश्वनाथ कुमठेकर आदींचे सहकार्य लाभले.

पालापाचोळा, भाज्यांचा व फळांचा टाकाऊ भाग व अन्य कुजणारा कचरा हा कचरा नसून ते सोनेच आहे. अशा प्रकारच्या कचऱ्याद्वारे सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येते. हा विचार या स्वच्छता मोहिमेतून रुजविण्याचे काम ग्लोबल मालवणीने केले. सगळा कचरा पालिकेने गोळा करून डंपिंग ग्राऊंडला जमा करावा हा चुकीचा पायंडा बदलण्यासाठी ग्लोबल मालवणीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक झाले. संघटनेने समुद्रकिनारी दोन खड्डे खोदले होते. त्यामध्ये वाहून आलेली छोटी लाकडे जमा कली. नागरिकांनी अशाच प्रकारे आपल्या घराच्या शेजारी खड्डा खोदून कुजणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी किंवा त्याचे खत बनवावे, असे आवाहन ग्लोबल मालवणीकडून करण्यात आले.

प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व काचेच्या बाटल्याही गोळा करण्यात आल्या. प्लास्टिक कचरा भंगारवाल्याला देण्याचे ठरविले. काही प्लास्टिक बाटल्यांपासून देखावे बनवून पालखी सोहळ्यादिवशी काही स्वच्छतापर संदेशही देण्यात आले.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संस्थेचे सदस्य विक्रम जाधव यांनी केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे स्वच्छता दूत महेंद्र पराडकर, संस्थेचे सदस्य विजय पांचाळ, बबलू आचरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे सचिव नीलेश वालकर आणि उपाध्यक्ष बंटी केरकर यांनी उपक्रमाला सहकार्य करून सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

 

Web Title: Sindhudurg news Global Malvani cleans sea beach