पारंपरिक उत्पादने ‘ग्लोबल’- वाणिज्य मंत्रालयाची योजना

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 4 एप्रिल 2018

सावंतवाडी - महाराष्ट्रातील पारंपरिक उत्पादने आता ‘ग्लोबल’ होणार आहेत. पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक (जी. आय.) मिळवून ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ खुली करण्याची योजना केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी आखली आहे.

सावंतवाडी - महाराष्ट्रातील पारंपरिक उत्पादने आता ‘ग्लोबल’ होणार आहेत. पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक (जी. आय.) मिळवून ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ खुली करण्याची योजना केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी आखली आहे. यात देशभरातील ३०० जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यात समाविष्ट केले जाणार आहेत.

सावंतवाडीची लाकडी खेळणी, गंजिफा, देवगडचा हापूस, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ अशी कितीतरी स्थानिक पातळीवरील पारंपरिक उत्पादने जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या क्षमतेची आहेत; मात्र त्यांना बाजारपेठेपर्यंत जोडला जाणारा मार्ग नसल्याने यातील काही उत्पादने, त्यांच्याशी संबंधित कला-कौशल्य लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यावर अवलंबून असलेले कारागीर पर्यायी रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळू लागले आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री प्रभू यांनी नवी योजना आखली आहे. 

प्रभूंचा दावा
यासंदर्भात ‘सकाळ’शी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, ‘‘देशभरात अनेक पारंपरिक उद्योग आहेत. ते त्या भागाची ओळख सांगणारे असतात. यामध्ये हापूससारखी कृषी उत्पादनेही आहेत. वास्तविक यासाठी सर्वसामान्य लोक आपले कष्ट, आयुष्य खर्ची घालतात; मात्र याचा खरा फायदा बहुराष्ट्रीय कंपन्या, बडे उद्योजक यांना होतो. पारंपरिकपण जपणारे सर्वसामान्य मागे राहतात. यामुळे काही उद्योग अपेक्षित विस्तार करू शकले नाहीत, तर काही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे टाळण्यासाठी या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या उत्पादनांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जाणार आहे.’’

या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अनेक कलांचे पुनरुज्जीवन होणे अपेक्षित आहे. यावर काम सुरू केले आहे. यातून खऱ्या अर्थाने गांधीजींचे खेड्यांच्या समृद्धीचे स्वप्न साकारायला हातभार लागेल.
- सुरेश प्रभू,
 केंद्रीय वाणिज्य मंत्री

 

Web Title: Sindhudurg News Global Market with E commerce New scheme