ग्रामपंचायतीत आता राणेविरुद्ध सगळे

ग्रामपंचायतीत आता राणेविरुद्ध सगळे

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते आता कोणत्या पक्षात जातील, हे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या या राजकीय प्रवासातील सध्याच्या स्थितीचा फायदा विरोधकांकडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्याची व्यूहरचना त्यांच्या विरोधकांकडून आखण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांत राणेंचे समर्थ विकास पॅनेलविरोधात सगळे, अशी लढत बहुसंख्य गावात होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा राणेंना जिल्ह्यातील राजकीय वजन आणि वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता राणेंकडे सत्ता नसली तरी संघटनात्मक ताकद आहे. त्यातील अस्थिरतेचा विरोधक फायदा घेवून ते कसे काय यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकात होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकाचे बिगूल वाजलेले असताना राणेंच्या जिल्हा कार्यकारीणीची हकापलट्टी करण्याची खेळी प्रदेश काँग्रेसकडून खेळली. त्यामुळे आयत्यावेळी राणेंची गोची झाली आहे; मात्र त्यालाही राणेंनी तितक्‍याच ताकदीने पलटवार देण्याचा प्रयत्न करीत येणाऱ्या निवडणुका लढविण्यासाठी समर्थ विकास पॅनल जाहीर केले आहे. दुसरीकडे राणे नेमके कोणत्या पक्षात जातील हे निश्‍चित झालेले नाही ते भाजपाच्या वाटवेर आहेत, असे म्हटले जात असले तरी भाजपाने जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून इच्छुकांना आपल्याकडे ओढण्यास त्यांनी सुरवात केली आहे; मात्र आपण एकदा पदे आणि तिकीटे दिल्याचा शब्द दिल्यानंतर आयत्यावेळी माघार घेणार नाही, अशी भूमिका प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी सावंतवाडीत बोलून दाखविली होती. त्यामुळे श्री. राणे हे भाजपात गेल्यानंतर सुध्दा त्यांच्या सोबत आयत्यावेळी जाणाऱ्या उमेदवारांना संधी मिळेल, याची शाश्‍वती कमी आहे.

दुसरीकडे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जरी ग्रामपंचायत निवडणुकात राजकारण नको असे म्हटले असेल तरी अन्य नेते आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांचे हातात सबळ करण्यासाठी शिवसेना सुध्दा ताकदीने उतरणार आहे.
काँग्रेसमधुन राणे शेवटच्या क्षणी बाहेर पडल्यामुळे तुर्तास तरी काँग्रेसमध्ये तसे चेहरे दिसत नाही; मात्र राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर गेल्या बारा वर्षात पक्षात असुन सुध्दा अज्ञातवासात राहीलेल्या निष्ठावंतांनी तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादी सुध्दा स्वबळाची भाषा करीत आहे. या सर्व परिस्थितीत राणेंकडे आता कोणताही पक्ष नसल्यामुळे अनेक चेहरे आपल्या पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, असे अनेक पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने सर्वानीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात मनसेचा सुध्दा सहभाग आहे.
या सर्व राजकीय परिस्थितीत राणेंना आता आपल्या समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ताकद दाखवावी लागणार आहे. सद्यस्थिती त्यांच्याकडे पक्षाची ताकद नसली तरी त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्याला सोबत घेवून राणे ग्रामपंचायती ताब्यात घेवू शकतात का हे मात्र पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com