वैभववाडीत तीन ठिकाणी तिरंगी लढत

वैभववाडीत तीन ठिकाणी तिरंगी लढत

वैभववाडी -  सरपंचपदाकरिता तीन ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी, तर बारा ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होणार आहे. सदस्यपदाकरिता तीन प्रभागांत तिरंगी उर्वरित ३९ प्रभागांत दुरंगी लढत होणार आहे. दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता १५ सरपंचपदांकरिता ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ७५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्यपदाकरिता ४२ जागांसाठी ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आठ जागांसाठी कुणीही उमेदवारी अर्जच दाखल केलेले नाहीत.

तालुक्‍यातील १७ ग्रामपंचायतींची १६ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. १६ पैकी निमअरूळे ग्रामपंचायतीची सरपंच व सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर उंबर्डे सरपंचपदासह आठ सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उर्वरित १५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. प्रथमच थेट सरपंचपदाची निवडणूक होणार असल्याने उमेदवारांमध्ये निवडणूक प्रकियेबद्दल कुतूहल आहे.

अरूळे, कुर्ली आणि सडुरे-शिराळे या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. कुर्लीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांकरिता आहे. सरपंचपदाकरिता चित्रांगणी शांताराम पवार, दर्शना दयानंद पाटील आणि नलिनी नरेश पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. सडुरे-शिराळे सरपंच सर्वसाधारण महिलेकरिता आहे. येथुन देवयानी अजितसिंह काळे, अंकिता अरुण रावराणे, स्मिता रमाकांत रावराणे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. अरूळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आहे. भिकाजी पाडुरंग सुतार, उज्ज्वल सहदेव नारकर व सुरेश सूर्यकांत बोडके यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. या तीन ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढत होत आहेत.

उर्वरित बारा ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढती होणार आहेत. तिथवलीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. या ग्रामपंचायतीतून माजी सरपंच ज्योतिका दीपक हरयाण, सुरेश विठोबा हरयाण यांच्यात दुरंगी लढत होत आहे. नानीवडे ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरिता राखीव असून संगीता सीताराम कातकर व लक्ष्मी प्रकाश खाड्ये यांच्यात थेट लढत आहे.

तिरवडे तर्फे खारेपाटण ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण आहे. येथे रामदास तानाजी घुगरे आणि योगेश रमेश पाथरे यांच्यात दुरंगी लढत आहे. जांभवडे सरपंचपद सर्वसाधारण महिलाकरिता आरक्षित आहे. वैदेही योगेश गुरव व विनया विजय रांबाडे यांच्यामध्ये लढत आहे. या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कोळपे सरपंचपद सर्वसाधारण महिलांकरिता राखीव आहे येथून सुश्‍मिता सुनील कांबळे व आईशा हमीद लांजेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. उपळे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असून केशव काशिराम हडशी आणि तानाजी तुकाराम हडशी यांच्यामध्ये निवडणूक होणार आहे.

नेर्ले ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गाकरिता आहे. स्वप्नील बाळासाहेब खानविलकर व राजाराम बाबूराव जाधव या दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. या ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. नापणे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीकरिता आरक्षित आहे. या ग्रामपंचायतीतून जयप्रकाश सुरेश यादव व पांडुरंग आत्माराम यादव यांच्यात दुरंगी लढत होत आहे. या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

करूळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलाकरिता राखीव आहे. येथून सरिता दत्ताराम कदम व साची सचिन कोलते यांच्यात लढत होणार आहे. या ग्रामपंचायतीच्या सर्व जागांची निवडणूक होणार आहे. नावळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरिता आहे. सरपंचपदाकरिता अनिता मंगेश गुरव व स्नेहा सुरेश शेळके यांच्यात दुरंगी लढत होत आहे. तीन ग्रामपंचायतींच्या तीन प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 

एकूण १२५ सदस्यांची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी आठ आरक्षित जागांसाठी कुणीच अर्ज भरलेला नाही. त्यामुळे ११७ जागांची निवडणूक निश्‍चित होती. त्यापैकी ७५ जागांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे आता फक्त ४२ जागांची निवडणूक होणार आहे. त्याकरिता ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १५ सरपंचपदाकरिता ३३ उमेदवार रिंगणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com