शिवसेना, भाजपसमोर समर्थ पॅनेलचे कडवे आव्हान

शिवसेना, भाजपसमोर समर्थ पॅनेलचे कडवे आव्हान

वैभववाडी -  पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अनपेक्षित यश मिळविणाऱ्या भाजप-शिवसेनेसमोर ग्रामपंचायत निवडणुकीत समर्थ विकास पॅनेलने कडवे आव्हान निर्माण केले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढून पक्षनेतृत्वाचा विश्‍वास संपादन करणे आणि नव्याने स्थापन केलेल्या स्वाभिमानचा राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा मनसुबा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा आहे. बिनविरोध निवडून आलेल्या दोन सरपंचावर दावा केला आहे, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रितपणे लढणाऱ्या भाजप सेनेची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. जर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सेनेला यश मिळाले, तर अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या विरुद्ध तालुक्‍यात वातावरण आहे यावर शिक्कामोर्तब होईल आणि जर समर्थ विकास पॅनेलने बाजी मारली तर युतीला मिळालेला यश क्षणिक होते असा अर्थ काढला जाईल. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीपासून अलिप्त राहणेच पसंत केले आहे.

तालुक्‍यातील सतरा ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली त्यापैकी सोळा ग्रामपंचायतीची निवडणुक १६ ऑक्‍टोबरला होणार आहे. भाजप, शिवसेना आणि नव्याने स्थापन झालेल्या नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षामध्ये चुरस आहे. तर काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनेल सुध्दा निवडणुक रिंगणात आहेत.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला म्हणजेच आत्ताच्या स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पराभवाचा झटका बसला तर शिवसेना भाजपाला अनपेक्षित यश मिळाले. पराभवाची गंभीर दखल घेत पक्षश्रेष्ठीनी पदे सांभाळणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. आता नारायण राणेंनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. त्यांचेच समर्थ विकास पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा लागलेला डाग पुसून पक्षश्रेष्ठीचा संपादन करण्याचा येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मनसुबा आहे.

स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी पुर्ण ताकदीनिशी निवडणुक प्रकियेत उतरले आहेत. बहुतांशी ग्रामपंचायती जिंकुुन नव्याने स्थापन झालेल्या स्वाभिमानचा तालुक्‍याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे. भाजपाने दहा ग्रामपंचायतीमध्ये आपले सरपंचपदाचे उमेदवार उभे केले आहेत. तर सहा ठिकाणी त्यांनी ग्रामविकास आघाडीला पाठींबा जाहीर केल्याचे स्पष्ट केले. मात्र, ज्या कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघातुन भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला 

त्याच मतदारसंघातील उंबर्डे ग्रामपंचायतीचा सरपंच समर्थ पॅनेलने बिनविरोध निवडून आणला आहे. तर करूळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाने सरपंचपदाचा उमेदवार दिलेला नाही. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचा जिल्हा परिषद निवडून आला आहे. या मतदारसंघातील गडमठ, कुर्ली, अरूळे, निमअरूळे, सडुरे-शिराळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यापैकी निमअरूळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

विशेष म्हणजे सरपंच समर्थ पॅनेलचा आणि निवडुन आलेले पाच सदस्य भाजपाचे आहे. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये सेना भाजप आमने सामने आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमान पक्षाकरीता मोठी संधी आहे. कोळपे जिल्हा परिषदमध्ये कोळपे, तिथवली, जांभवडे, हेत, उपळे, नेर्ले, नानीवडे, तिरवडे तर्फे खारेपाटण या सात ग्रामपंचायतीची निवडणुक होत आहे. स्वाभिमान पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन या जिल्हा परिषद मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तीनही जागा पक्षाने जिकंल्या आहेत. त्यामुळे विजयी परपंरा ठेवण्याचे स्वाभिमानचे धोरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com