धोबीपछाडचे राजकारण समर्थ पॅनेलच्या पथ्यावर

एकनाथ पवार
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले.

वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा समर्थने काढला. या निवडणुकीत पुन्हा एकदा काही वर्षांपासून चर्चेत असलेला मॅनेज पॅटर्नही लोकांना अनुभवायास मिळाला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ पॅनेलला मिळालेले देदीप्यमान यश त्या पक्षाच्या वाटचालीकरीता प्रेरणादायी ठरणार आहे.

आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेने अनपेक्षित यश मिळाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. संपूर्ण तालुक्‍यावर राजकीय वर्चस्व असताना भाजप शिवसेनेने त्या निवडणुकीत ६० टक्के यश मिळविले होते. त्यातच प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक होणार असल्याने ही निवडणूक महत्त्वाची होती.

तालुक्‍यातील सतरा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या त्यापैकी एक दोन ग्रामपंचायतींचा अपवाद वगळला, तर बहुतांशी ग्रामपंचायतींवर राणे समर्थकांचे वर्चस्व होते, परंतु पंचायत समिती निवडणूक निकालामुळे या वर्चस्वाला तडा गेला होता. पंचायत समिती निवडणुकीत कोळपे जिल्हा परिषद, कोळपे पंचायत समिती व भुईबावडा आणि उंबर्डे पंचायत समिती राखण्यात राणे समर्थकांना यश आले होते. उर्वरित दोन्ही जिल्हा परिषद भाजप शिवसेनेने जिंकल्या होत्या.

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील कोळपे, तिथवली, तिरवडेतर्फे खारेपाटण, नानीवडे, हेत, जांभवडे, उपळे, नेर्ले यापैकी सहा ग्रामपंचायती समर्थ विकासने एक हाती जिंकल्या. नानीवडेत प्रभाव असलेल्या नासीर काझीना मात्र धक्का बसला, तर विद्यमान पंचायत समिती सदस्य दुर्वा खानविलकर यांच्या नेर्ले ग्रामपंचायतीत समर्थ पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या  गावात समर्थने बाजी मारत या जिल्हा परिषद मतदारसंघात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले.

कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघातील कोकिसरे, उंबर्डे आणि नापणे या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक होती. कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. परंतु तीनही ग्रामपंचायती समर्थने जिंकल्या. वैशिष्ट्य म्हणजे उंबर्डे ग्रामपंचायत बिनविरोधपणे समर्थ विकासला बहाल केली. शतप्रतिशतचा दावा करणाऱ्या भाजपला सरपंच आणि सदस्यपदाकरीता उमेदवार मिळू नये हे कशाचे द्योतक मानावे, हा खरा प्रश्‍न आहे.

उंबर्डे प्रमाणेच करूळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपची भुमिका संदिग्ध आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था ठरणारी होती. येथे समर्थ विकास विरूध्द ग्रामविकास आघाडीत लढत असली तरी भाजपचे मतदान निर्णायक होते. ही ग्रामपंचायत देखील समर्थ विकास जिंकली. नापणे ग्रामपंचायतमध्ये सुध्दा समर्थने विजयी पताका रोवली. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या भाजपचे सुधीर नकाशे यांच्याकरीता ही धोक्‍याची घंटा आहे. त्यांना एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही.

लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात गडमठ, कुर्ली, सडुरे-शिराळे, अरूळे, निमअरूळे, नावळे या सहा ग्रामपंचायतीची निवडणुक होती. पैकी एक सडुरे शिराळे वगळता सर्व ग्रामपंचायती समर्थ विकासने जिंकल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत लोरे जिल्हा परिषद युतीच्या माध्यमातुन शिवसेनेने जिंकली होती. परंतु या निवडणुकीत दोन्ही पक्षांना सपाटुन मार खावा लागला.
१७ पैकी १४ ग्रामपंचायतीवर समर्थ विकासने निर्विवाद वर्चस्व मिळविले. दोन ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या तर ग्रामविकास आघाडीने एक ग्रामपंचायत राखण्यात यश मिळविले.

आगामी विधानसभेची ही रंगीत तालीम होती. यानंतर राजकीय पक्ष थेट विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे राजकीय ताकद आजमावण्याची ही अखेरची संधी होती. पंचायत समिती निवडणुकीप्रमाणे शिवसेना भाजपमध्ये कुठेही एकवाक्‍यता दिसुन आली नाही. उलट दोन्ही पक्षांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतुने प्रचार यंत्रणा राबविली. त्याचा आपसुक फायदा समर्थ विकासला झाला. पंचायत समितीतील पराभवामुळे समर्थ विकास पुर्णपणे सावध होते. कोणताही धोका त्यांनी पत्करला नाही.

आमदार नितेश राणेंनी ठरवुन दिलेल्या रणनितीप्रमाणे काही महिन्यापुर्वी तालुकाध्यक्षपदाची सुत्रे स्विकारलेल्या अरविंद रावराणे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. भपकेबाजीला फाटा देत त्यांनी अतिशय गोपनीय पध्दतीने काम केले. त्यात त्यांना यश आले. या विजयाने श्री. रावराणे यांच्या नेतृत्वावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचे नेतृत्व सिध्द करण्यासाठी अदृश्‍य मदत झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत तालुकाप्रमुख मंगेश लोक पुन्हा एकटे पडल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते.

भाजपमध्ये एकसंघता दिसलीच नाही...
निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकसंघता कुठेच दिसली नाही. ज्या पध्दतीने पंचायत समिती निवडणुकीत अतिशय नियोजनपध्दतीने काम केले होते. तशी रणनिती या निवडणुकीत दिसली नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. काही गावांमध्ये पदाधिकाऱ्यांची भुमिकाच गावातील कार्यकर्त्याना रूचत नव्हती. त्याचा एकुण परिणाम निवडणुक निकालावर दिसुन आला. भाजपत अतुल रावराणे, प्रमोद रावराणे, बंडु मुंडल्ये, राजेंद्र राणे, सभापती लक्ष्मण रावराणे, स्नेहलता चोरगे,सुधीर नकाशे यांच्यासारखे मातब्बर असुन देखील त्यांना यश मिळविता आले नाही. या पदाधिकाऱ्यांमधील मतभेदांमुळेच भाजपाच्या पदरी अपयश आले असे सामान्य कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. 

मित्रत्वांपुढे हरले पक्ष
वेगवेगळ्या राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगली मैत्री असते. परंतु या मैत्रीचा उपयोग राजकारणाकरीता होतो का हा खरा प्रश्‍न असतो. या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील मित्रत्वांपुढे पक्ष हरल्याची चर्चा कार्यकर्त्यामध्ये सुरू आहे. 

 

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election result