घोटगे-वायंगणतडला ४५ वर्षांनंतर मिळाले सरपंचपद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

दोडामार्ग - घोटगे-वायंगणतड ग्रामपंचायतीचे सरपंचपद ४५ वर्षांनंतर वायंगणतडला मिळाले आहे. ग्रामस्थांमधून थेट सरपंच म्हणून संदीप नाईक निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची गुरुवारी (ता. १९)  भेट घेतली.

दोडामार्ग - घोटगे-वायंगणतड ग्रामपंचायतीचे सरपंचपद ४५ वर्षांनंतर वायंगणतडला मिळाले आहे. ग्रामस्थांमधून थेट सरपंच म्हणून संदीप नाईक निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची गुरुवारी (ता. १९)  भेट घेतली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदीप नाईक यांना भाजपने घोटगे सरपंच पदासाठी उमेदवारी नाकारल्याने नाईक यांनी स्वतंत्र गावविकास पॅनेलमधून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्यांच्या निवडून येण्याने ४५ वर्षांनंतर वायंगणतडला सरपंचपद मिळाले आहे. सरपंचपदी निवडून आल्यानंतर सर्व प्रथम त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी उपस्थित होते.

घोटगे वायंगणतडच्या सात सदस्यांपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते; तर सरपंच व एक सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. सरपंच पदासाठी घोटगे गावातून नारायण दळवी, कानू दळवी, नंदकिशोर दळवी तर वायंगणतडमधून संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली. श्री. नाईक १२ मतांनी विजयी झाले. घोटगे वायंगणतड ग्रामपंचायतीवर गेली ४५ वर्षे घोटगे गावातीलच सरपंच निवडून यायचे.

या वेळी थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने वायंगणतड येथील ग्रामस्थ आणि मतदार श्री. नाईक यांच्या पाठीशी ठाम राहिले. घोटगे गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी यांची त्यांना साथ लाभली. त्यांनी श्री. नाईक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाने नाईक यांना जी मते मिळाली ती त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली. पूर्वी निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होत होती. त्यात घोटगे गावात चार तर वायंगणतडला दोन सदस्य असल्याने नेहमीच या वाडीला सरपंच पदापासून दूर राहावे लागले.

याआधी ४५ वर्षांपूर्वी (कै.) मुकुंद नाईक हे वायंगणतडमधील ग्रामस्थ घोटगे वायंगणतडचे सरपंच झाले होते. त्यानंतर या वेळेला थेट गावातील सर्व मतदारांनी सरपंच निवडून द्यायचा असल्याने संदीप नाईक यांना सरपंच पदाचा मान मिळाला आहे.

सरपंच नाईक यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची सावंतवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत संतोषकुमार दळवी, भगवान दळवी, विश्वनाथ दळवी, माजी पोलिसपाटील शंकर जाधव आदी उपस्थित होते. या वेळी श्री. सावंत यांनी श्री. नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. श्री. नाईक यांनी गावाच्या विकासासाठी आपले सहकार्य व मार्गदर्शन हवे अशी अपेक्षा श्री. सावंत यांच्याकडे व्यक्त केली. श्री. सावंत यांनी घोटगे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

दलितवस्तीलाही सदस्यपद
गेली कित्येक वर्ष घोटगे दलितवस्तीला ग्रामपंचायत सदस्य वा सरपंच पदाचा लाभ मिळाला नव्हता. या वेळी मात्र बदल व्हावा आणि दलितवस्तीला एक तरी सदस्यपद मिळावे या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी यांनी पुढाकार घेतल्याने दलितवस्तीला सदस्यपद मिळाले आहे. ४५ वर्षांपूर्वी या वाडीतील (कै.) मधुकर जाधव हे माजी सरपंच (कै.) मधुकर दळवी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर आज दीपज्योती जाधव यांना सदस्य म्हणून ग्रामपंचायत सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.

 

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election result