वेंगुर्लेतील प्रदर्शनात हापूस पलिकडचे आंबा विश्‍व 

दिपेश परब
बुधवार, 9 मे 2018

वेंगुर्ले - येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला कालपासून (ता. 8) सुरूवात झाली. यात आंब्याच्या एकूण 178 जातींचे प्रदर्शन मांडले आहे. येथील आंबा विभागाने प्रत्यक्षात आंबा फळाच्या सुमारे 307 आंबा जातींची लागवड केली असून त्यापैकी उपलब्ध झालेल्या 178 जातींचे आंबे या प्रदर्शनात आहेत.

वेंगुर्ले - येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला कालपासून (ता. 8) सुरूवात झाली. यात आंब्याच्या एकूण 178 जातींचे प्रदर्शन मांडले आहे. येथील आंबा विभागाने प्रत्यक्षात आंबा फळाच्या सुमारे 307 आंबा जातींची लागवड केली असून त्यापैकी उपलब्ध झालेल्या 178 जातींचे आंबे या प्रदर्शनात आहेत. यात देशाबाहेरील 10 तर विद्यापीठाने विकसित केलेल्या आंब्याच्या 7 जातीही प्रदर्शनास लावल्या आहेत.

भारतात पुरातन काळापासूनच आंब्याची लागवड केली जाते. देशात सुमारे एक हजारपेक्षा जास्त आंबा फळाच्या विविध जाती प्रजाती लागवडीखाली आहेत. विविध राज्यात हजारो हेक्‍टर क्षेत्रात आंब्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील हापूस या आंब्याची ख्याती जगभर आहे. हापूस आंब्याला अमेरिका, इंग्लड, रशिया आदी देशांमध्ये मोठी बाजारपेठ आहे.

येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात दो फसला, व्हिलायन कोलम्बन, चौरा, नीलम आदी जवळपास 235 जातींची लागवड करण्यात आली आहे. त्याशिवाय पामर, व्हिलायन कोलबन या विदेशातील, गोपाळ भोग, लंगडा, सफेदा, चौसा, तौमुरीया या उत्तरप्रदेश, हेमसागर, कृष्णभोग, सिंदुराय या बिहार आदी राज्यातील आंबा जाती संशोधन करून विकसित केल्या आहेत. विद्यापीठाने संकर करून तयार केलेल्या रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा, कोकण सम्राट या जातीही आहेत.

विद्यापीठाने विकसित केलेली रत्ना ही चांगली जात असून आकारानेही मोठी आहे. तसेच दरवर्षी येणारी ही जात आहे. त्याचप्रमाणे सिंधू ही सुद्धा उत्कृष्ठ जात असून या आंब्याचा बाटा पातळ आहे व यात मुख्य म्हणजे हापूसचे गुण आहेत. विद्यापीठाने 2 ते 3 वर्षांपूर्वी हापूस व परदेशी जात ऑमीऍटकिन्स या जातींना मिळवून विकसित केलेली कोकण सम्राट जातीची भविष्यात खूप मागणी होईल, असा विश्‍वास शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने हापूसच्या पलीकडे आंब्याच्या इतर जातींनाही प्रसिध्दी मिळाली आहे.

Web Title: Sindhudurg News Hapus Vegurle Exhibition