मालवणात पुरस्थितीने लाखोंची हानी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मालवण - तालुक्‍यात गेले दोन दिवस विक्रमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आज पावसाचा जोर ओसरल्याने तालुकावासीयांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

मालवण - तालुक्‍यात गेले दोन दिवस विक्रमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आज पावसाचा जोर ओसरल्याने तालुकावासीयांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या शहरातील विविध भागाची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज पाहणी करून नैसर्गिक पाण्याचे स्रोत सुरळीत करण्यासाठी गटारांवर झालेली अनधिकृत बांधकामे तत्काळ हटविण्याची कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिले आहेत. 

देवली येथील मुख्य रस्त्यावर पडलेली दरड जेसीबीच्या साहाय्याने हटवित मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी ओसरले आहे.

दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात शहरातील बांगीवाडा येथील रफातुल्ला खान यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. आंबेरी येथील भानू चौकेकर यांच्या घराची भिंत कोसळून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. वायरी येथील भिवा शिरोडकर यांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने घरातील धान्य, कपडे तसेच गृहोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातील मालवणी बझार दुकानात मध्यरात्री पावसाचे पाणी घुसल्याने किराणा माल भिजून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. नांदोस येथील वसंत गावडे यांच्या घरावर जांभळीचे झाड पडून 2 हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे.

दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील देऊळवाडा, बाजारपेठ, वायरी, आडवण, मेढा, धुरीवाडा, रेवतळे तसेच अन्य भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांच्या घरांत पाणी घुसले तर काही घरांना चहूबाजूने पाण्याने वेढा घातला होता. या पार्श्‍वभूमीवर आज नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी बांधकाम, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व ठिकाणांची पाहणी केली.

यावेळी पूर्वी अस्तित्वात असलेल्या मोऱ्यांची लांबी, उंची वाढविण्याची आवश्‍यकता असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अनेक गटारांवर झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद झाल्यानेच घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अशी अनधिकृत बांधकामे तत्काळ हटविण्याची कार्यवाही करण्याची सूचना नगराध्यक्षांनी बांधकाम विभागास दिल्या. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मोऱ्यांची संख्या तसेच उंची वाढविण्याची गरज आहे त्यादृष्टीने आवश्‍यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

पुरस्थितीच्या तिव्रतेस पालिका प्रशासन जबाबदार
पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे तसेच घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडले. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. यात अनेकांनी दगडी कुंपणे घातल्याने पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले. प्रत्यक्षात नवीन बांधकामांना परवानगी देताना पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोत कुठे आहेत याचा आराखडा पालिका प्रशासनाकडे असणे आवश्‍यक होते. त्यानुसारच नवीन बांधकामांना परवानगी द्यायला हवी होती; मात्र याची कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून न झाल्यानेच शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. 

Web Title: Sindhudurg News heavy loss in Malvan in Rain