दोडामार्गला वादळी तर वैभववाडीत 114 मि. मी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

दोडामार्ग - तालुक्‍याला आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने झोडपून काढले. सोसाट्याचा वाराही सुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेसह परिसरातील रस्त्यांना तळ्याचे रूप आले होते. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान वैभववाडीत आज 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

दोडामार्ग - तालुक्‍याला आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने झोडपून काढले. सोसाट्याचा वाराही सुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेसह परिसरातील रस्त्यांना तळ्याचे रूप आले होते. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान वैभववाडीत आज 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

जिल्ह्यात चार दिवसांपुर्वी पावसाने हाहाकार माजवला; मात्र तेव्हा दोडामार्गमध्ये पावसाचा मागमूस नव्हता; पण आज दुपारी पावसाने तालुक्‍याला झोडपून काढले. सोसाट्याचा वारा सुटला होता. हवेत गारवाही होता. गटार व्यवस्था पावसामुळे कोलमडल्याने रस्त्यांचे तळे झाले होते. येथील बाजारपेठेतील रस्ते आणि त्यातील खड्डे साचलेल्या पाण्यामुळे दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधा उडत होती.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 37 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस व कंसात आतापर्यंतचा सरासरी पाऊस मिलीमीटरमध्ये असा ः दोडामार्ग 28 (854), सावंतवाडी 33 (1048), वेंगुर्ले 9 (1451.8), कुडाळ 36(1201), मालवण 25 (1700), कणकवली 46 (923), देवगड 05 (1890), वैभववाडी 114 (967.05) पाऊस झाला आहे.

वीज, नेटवर्क गायब
तालुक्‍यात काल (ता.25) पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दोन मिनिटे वीज राहायची पुन्हा दहा मिनिटे गायब व्हायची. दिवस आणि रात्रभर विजेचा खेळखंडोबा सुरु होता. त्यानंतर आजही तीच स्थिती होती. दिवसभर वीज गायब होती. मोबाईलचे नेटवर्कही सुरळीत नव्हते.

अतिवृष्टीचे सावट
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाने जिल्ह्यात 27 तारिखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असले तरी अतिवृष्टीचे सावट कायम आहे.
 

Web Title: Sindhudurg News Heavy Rains in Dodamarg