काजू, मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांत मोठा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - सहकार खात्याच्या कामचलाऊ धोरणामुळे जिल्ह्यात सहकार तत्त्वावर सुरू असलेले सहा काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यात मोठा अपहार झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेकडून चौकशी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सावंतवाडी - सहकार खात्याच्या कामचलाऊ धोरणामुळे जिल्ह्यात सहकार तत्त्वावर सुरू असलेले सहा काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यात मोठा अपहार झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेकडून चौकशी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यात कथित अपहार झाल्याची माहिती देण्यासाठी समितीने येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ. संजय सामंत, संदेश गावडे, संतोष परब आदी उपस्थित होते.

इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील एका सहकारी कारखान्याच्या नावावर तब्बल पाच कोटींहून अधिक कर्ज काढण्यात आले आहे. त्यात पहिले भागभांडवल दाखवून शासनाकडून दोन कोटी ४५ लाखांचे कर्ज घेण्यात आले होते. ते कर्ज घेताना संस्थेच्या सातबारा किंवा अन्य मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा बोजा ठेवण्यात आलेला नाही. त्याचा फायदा घेऊन संस्था पुन्हा डबघाईला आल्याचे दाखवून पुन्हा बॅंकेकडून एक कोटी साठ लाखाचे कर्ज घेण्यात आले. हा सर्व प्रकार म्हणजे फसवणूक आहे. यात संबंधित संस्थेकडून तारण म्हणून ठेवण्यात आलेली जमीन एक हेक्‍टर साठ गुंठे आहे. 
इमारत आणि अन्य मालमत्ता मिळून पन्नास लाख रुपयांची मालमत्ता आहे. असे असताना त्यांना संबंधित बॅंकाकडुन पाच कोटी रुपयाचे कर्ज कसे काय देण्यात आले.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘या सर्व प्रकारामागे सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांचा हात आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशा तक्रारी आम्ही संबंधित खात्याकडे केल्या होत्या; मात्र अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रसंगी आम्ही आंदोलनासह या प्रकाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागू.’’

जबाबदारांकडून वसुली करावी...
यावेळी डॉ. सामंत म्हणाले, ‘‘याठिकाणी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन सहकारी तत्त्वावर उभारण्यात येणारे प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याचा फायदा उत्पादकांना देणे गरजेचे आहे. असे असताना या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ? याची चौकशी शासनाकडून होणे गरजेचे आहे. हा प्रकार चौकशीवर न थांबता संबंधितांकडून वसूली करून त्या पैशाचा विनियोग अन्य कामांसाठी होणे अपेक्षित आहे.’’

Web Title: Sindhudurg News Hindu Janjagruti committee press