वेंगुर्ले येथे 8 पासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

वेंगुर्ले - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर ऍडव्हॉन्मेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अॅण्ड टेक्‍नॉलॉजी यांच्यावतीने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात 8 ते 11 या कालवधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होत आहे. 

वेंगुर्ले - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर ऍडव्हॉन्मेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अॅण्ड टेक्‍नॉलॉजी यांच्यावतीने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात 8 ते 11 या कालवधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होत आहे. 

प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना 1957 मध्ये झाली. त्यानंतर येथे आंब्यावर महत्वपूर्ण संशोधन झाले. आंबा विषयक महत्वपूर्ण संशोधनात्मक योगदानाबद्दल तसेच संशोधन विषयाच्या माहितीचे जागतिक पातळीवर देवाणघेवाण करुन बदलत्या वातावरणात शाश्‍वत आंबा उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या संकल्पनेतून प्रथमच जिल्ह्यात अशी परिषद होत आहे. यात देशविदेशातून 150 हून अधिक कृषि शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.

या परिषदे दरम्यान विविध विषयांवर तांत्रिक सत्र होतील. मुख्यत्वेकरुन जागतिक पातळीवर आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशीकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन, शाश्‍वत उत्पादन आणि कृषि तंत्रज्ञान, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषि अर्थशास्त्र, आंबा पिकातील निर्यात इत्यादी विषयांचा समावेश आहे. यानिमित्ताने आंबा उत्पादन करणाऱ्या जगभरातील शास्त्रज्ञ, आंबा बागायतदार, आंबा व्यापारी विविध विषयांचे विद्यार्थी यांना आंबा उत्पादनाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यात आंबा बागायतदार व शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र होणार आहे.

यावेळी कृषी विषयक प्रदर्शनही होईल. यात 200 हून अधिक आंब्याच्या जाती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आंब्यामध्ये यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने विविध यंत्र सामुग्रीचे प्रात्यक्षिकही होणार आहे. याशिवाय विविध कृषी विषयक प्रशिक्षणे, मत्स्य संवर्धन प्रशिक्षणांचा यात समावेश असेल. 

Web Title: Sindhudurg News International Mango conference in Vengurle