"सिंधुकन्या' मोजतेय अखेरचा घटका 

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मालवण - पर्यटन महामंडळाची सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेली "सिंधुकन्या' हाऊसबोट तारकर्ली खाडीपात्रात बुडत अखेरची घटका मोजत आहे. बोटीला पडलेल्या छिद्रांची एमटीडीसी प्रशासनाकडून वेळेत दुरुस्ती न झाल्यामुळेच बोटीला जलसमाधी मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

मालवण - पर्यटन महामंडळाची सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेली "सिंधुकन्या' हाऊसबोट तारकर्ली खाडीपात्रात बुडत अखेरची घटका मोजत आहे. बोटीला पडलेल्या छिद्रांची एमटीडीसी प्रशासनाकडून वेळेत दुरुस्ती न झाल्यामुळेच बोटीला जलसमाधी मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, बोटीतील पाणी उपसा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला अद्यापपर्यंत यश मिळालेले नाही. त्यामुळे एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाला बोलाविण्यात आले आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती तारकर्ली एमटीडीसी व्यवस्थापक एस. ए. कांबळे यांनी दिली. बोट पाण्याबाहेर काढण्यासाठी बंदर विभागाचीही मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
एमटीडीसी प्रशासनाच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

हाऊसबोटला लिकेज झाल्याने ती काही दिवसांपूर्वी तारकर्ली जेटीवर आणून ठेवण्यात आली होती. मात्र योग्यप्रकारे दुरुस्ती वेळेत न झाल्याने संपूर्ण बोटीत खाडीचे पाणी घुसून बोट नुकसानग्रस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी माजी सरपंच डॉ. जितेंद्र केरकर व तारकर्ली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. 

सिंधुकन्या हाऊसबोट खाडीच्या पाण्यात बुडाली. त्यामुळे बोटीत असलेल्या सर्व साहित्याचेही नुकसान झाले आहे. बोटीतील इंजिन, एसी, टीव्ही यासह अन्य किमती वस्तू निकामी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यटन महामंडळाने स्थानिकांची मदत घेत बोटीला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न आज सुरू केले मात्र बोटीत पूर्ण पाणी भरल्याने त्यांना यात यश मिळाले नाही. 

सिंधू कन्या ही हाऊसबोट 2012-13 साली तारकर्ली एमटीडीसीच्या ताफ्यात पर्यटन सेवेसाठी दाखल झाली होती. तारकर्ली खाडी परिसरात सिंधू कन्या बोटीसह सावित्री, हिरण्यकेशी व कर्ली या हाऊसबोट सेवेत होत्या. मात्र सुधारणा व दुरुस्तीच्या नावाखाली हिरण्यकेशी व कर्ली या हाऊसबोट वर्षभरापूर्वी खाडी किनाऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. पर्यटकांच्या सेवेसाठी केवळ सावित्री ही एकमेव बोट कार्यरत आहे. 

आरामदायी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशी विदेशी पर्यटक ऑनलाइन पद्धतीने या हाऊसबोटचे बुकिंग करतात. पर्यटकांच्या सेवेसाठी दोन रूम आहेत. बोट आलिशान व आकाराने मोठी आहे. बांबू मॅट्‌स काठ्या, लाकूड, सुपारीची झाडे, यांचा उपयोग छतासाठी, जमिनीसाठी काथ्याच्या चटया, लाकडी फळ्या आणि नारळाच्या झाडाचे लाकूड आणि काथे पलंगासाठी वापरण्यात आले आहेत. लाइट साठी सोलर पॅनेलचा वापर केला आहे.

हाऊसबोट मध्ये सर्व सुखसोई आहेत. यामध्ये फर्निश्‍ड बेडरूम, आधुनिक टॉयलेट, आरामदायक दिवाणखाने, स्वयंपाकघर आणि बाल्कनी सुद्धा यांचा समावेश आहे. 

Web Title: Sindhudurg News issue of SindhuKanya