जगन्नाथराव भोसलेंची स्मारकरूपी शाळा इतिहासजमा

अमोल टेंबकर
मंगळवार, 5 जून 2018

सावंतवाडी - सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबर स्वातंत्र मिळाल्यानंतर नेहरूंच्या मंित्रमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या स्वातंत्र्यसेनानी जनरल जगन्नाथराव भोसले यांच्या नावाने येथे असलेली स्मारकवजा जिल्हा परिषद शाळा अखेर पाडण्यात आली. त्यामुळे तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास कालजमा झाला आहे.

सावंतवाडी - सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबर स्वातंत्र मिळाल्यानंतर नेहरूंच्या मंित्रमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या स्वातंत्र्यसेनानी जनरल जगन्नाथराव भोसले यांच्या नावाने येथे असलेली स्मारकवजा जिल्हा परिषद शाळा अखेर पाडण्यात आली. त्यामुळे तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास कालजमा झाला आहे.

विद्यार्थ्यांअभावी ही शाळा बंद करावी लागली. आता याठिकाणी नव्याने इमारत होणार असून, त्याचा वापर पंचायत समितीच्या कार्यालयासाठी करण्यात येणार आहे, असे पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांचे म्हणणे आहे.

संस्थानकालापासून ही शाळा उभी होती. याला दीडशे वर्षे झालीत. मात्र, शासनाच्या नव्या धोरणानुसार ही शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद झाली. संस्थानकालीन आणि इतिहास सांगणारी शाळा पाडली जात असल्यामुळे नागरिक, माजी विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता पटसंख्येअभावी ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी फक्त सहा मुले होती. त्यांना दोन शिक्षक देणे परवडणारे नव्हते. त्यामुळे ते विद्यार्थी अन्य शाळेत वर्ग केले आहेत. आता त्याठिकाणी नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे.

भविष्यात पुन्हा त्याठिकाणी शाळा वर्ग सुरू करावेसे वाटल्यास दोन वर्ग खोल्या आरक्षित ठेवणार आहे; परंतु तूर्तास त्याठिकाणी पंचायत समिती कार्यालयाचा काही भाग हलविण्यात येणार आहे. आपल्या स्वातंत्र्यसेनानी काकांच्या नावे चालविण्यात येणारी शाळा बंद करू नये, यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांची भेट घेतली; मात्र पटसंख्येअभावी नाईलाजाने ही इमारत पाडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

जिल्हा परिषदेकडून अवहेलना चुकीची
या प्रकाराबाबत भोसले यांचे नातू सुरेंद्र भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. अशा थोर व्यक्तीच्या स्मारकाची जिल्हा परिषदेकडून अवहेलना होणे चुकीचे आहे. त्यांचा सर्व इतिहास लक्षात घेता याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

शाळेची जागा शहराच्या मध्यभागी होती. त्यामुळे इंग्लिश मीडियमसारखी छोटी शाळा सुरू झाल्यास त्याठिकाणी नक्कीच पुन्हा त्या शाळेला गतवैभव प्राप्त होऊ शकते. त्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.
- यतिन तावडे,
सावंतवाडी 

Web Title: Sindhudurg News Jagannathrao Bhosale School