कर्नाटकी मंत्र्याला औकात दाखवायची वेळ; मुंबईत येऊनच दाखवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

कर्नाटकच्या मंत्र्यांने जय महाराष्ट्र उल्लेख करण्यास बंदी करत मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकातील अनेक गाड्यांवर जय महाराष्ट्र असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहे. 

मालवण : कर्नाटक राज्याचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्रात मुंबईत येऊन दाखवावे. मग त्याला जय महाराष्ट्र म्हणजे काय ते दाखवून देऊ. बेग यांना त्यांची औकात दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यात कर्नाटकच्या ज्या गाड्या येतील त्या सर्व गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहिले जाईल. या आंदोलनात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असून बेग यांनी कर्नाटकातील कोणतेही ठिकाण सांगावे शिवसेना तेथे येऊन जय महाराष्ट्र लिहून दाखवेल असा इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज येथे दिला. 

तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक आज भरड येथील हॉटेल लिलांजली येथे झाली. या बैठकीस उपस्थित  दुधवडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  दुधवडकर म्हणाले, “बेळगावसह अखंड महाराष्ट्र होण्यासाठी मराठी बांधव गेली अनेक वर्षे त्रास सहन करत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकच्या मंत्र्यांने जय महाराष्ट्र उल्लेख करण्यास बंदी करत मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकातील अनेक गाड्यांवर जय महाराष्ट्र असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहे. 

जय महाराष्ट्र म्हणजे काय ते बेग यांना दाखवून  देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील मुंबईत येऊनच दाखवावे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. बेळगावात मराठी बांधवांच्यावतीने सुरू असलेल्या लढ्यात शिवसेना सदैव सहभागी झालेली आहे. आपण काल बेळगावात जाऊन जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आंदोलन तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. बेग याला त्याची जागा लवकरच दाखवून दिली जाईल.”

Web Title: sindhudurg news jai maharashtra ban malvan dares roshan baig enter mumbai