नाकर्त्या ठेकेदारांमुळेच महामार्ग खड्ड्यात - काका कुडाळकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कुडाळ, - जीएसटीचे कारण दाखवून ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम झाले नाही. शासनाने आपली जबाबदारी पूर्ण केली होती. येत्या आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते काका कुडाळकर यांनी दिली.

कुडाळ, - जीएसटीचे कारण दाखवून ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम झाले नाही. शासनाने आपली जबाबदारी पूर्ण केली होती. येत्या आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते काका कुडाळकर यांनी दिली.

ते म्हणाले,‘‘जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे जनता त्रस्त झाली हे आम्ही कबूल; मात्र यासाठी शासनाने आपल्या परीने पूर्णपणे जबाबदारी पार पाडली. ठेकेदारांनी कवळ जीएसटीचे कारण दाखवून खड्डे भरण्याचे काम सुरु केले नाही. खड्डे बुजविणे या मागणीसाठी आम्ही सुद्धा आक्रमक आहोत. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गणेश चतुर्थीला दौरा केला होता.

खड्डे भरण्यासाठी आवश्‍यक सूचना केल्या होत्या. निधी कमी पडणार नाही याबाबत आश्‍वासन दिले होते. जीएसटी नुसार टेंडरमध्ये काही फरक पडत होता. त्याबाबतही आम्ही प्रयत्न केला. राज्यात डीएसआर एकच लावला होता. तोही बदलून विभागीय स्तरावर स्थानिक दरानुसार अंदाजपत्रक बनविण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु सर्व बाबी असूनही ठेकेदारांनी खड्डे भरण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही.

शासनाने याबाबत २६ सप्टेंबरला परिपत्रक काढले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निगोसेशन करण्याचा अधिकार दिला होता. तरीसुद्धा प्रतिसाद आला नाही. जेटपॅचरने कार्यालयीन स्तरावर काम करावे असे आदेश २७ सप्टेंबरला शासनाने दिले होते. शासनाने याबाबत आपली जबाबदारी पूर्ण केली.’’

ते म्हणाले, ‘‘ठेकेदारावर अवलंबून न राहता आता या कामाची सुरवात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्हावी यासाठी आम्ही प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी येथे अधिक्षक अभियंता यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसात महामार्गावर खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत आही आता स्वस्थ बसणार नाही. येथील ठेकेदार हे २८ ते ३० टक्के बिलोने कामे घेतात. त्यावेळी त्यांना परवडत असते; पण जिल्ह्यातील जनता खड्डयाने त्रस्त होत आहे. शासन निगोसेशनला पूर्ण तयार असतांना निव्वळ ठेकेदारांनी जीएसटीचे कारण पुढे करुन जनतेला त्रासाला लोटले. भविष्यात भाजपा प्रत्येक कामावर योग्य त्या पद्धतीने नियंत्रण ठेवणार. आता नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदारांनासुद्धा काम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

रस्ता नगरपंचायतीकडे...
ते म्हणाले, ‘‘मठ कुडाळ घोटगे राज्यमार्गाच्या रस्त्याचा भाग हा कुडाळ नगरपंचायतीकडे वर्ग झाला. आमच्या मनात असूनही रस्त्याची डागडुजी करता येणार नाही. नगरसेविका उषा आठल्ये यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती; मात्र हा रस्ता निव्वळ बारचालकांच्या भल्यासाठी नगरपंचायतीने ताब्यात घेतला हा आमचा आरोप आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करतो, की या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी. दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटवावे.’’

ठेकेदारांना काळ्या यादीत टाका...
हिर्लोक पूल वाहून गेला. ज्या ठेकेदाराने हे काम केले, त्याला काळ्या यादीत घालावे, अशी मागणी करणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, राजू राऊळ, राजेश पडते उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Kaka Kudalkar Press