कलंबिस्त तलाठी लाच घेताना जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

सावंतवाडी - वारस तपासासाठी नोंद सातबाराला चढविण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना कलंबिस्त येथील तलाठ्याला आज रंगेहाथ पकडण्यात आले. मिलींद गजानन कुडतरकर (वय 50, रा. न्यू सबनिसवाडा) असे त्याचे नाव आहे.

सावंतवाडी - वारस तपासासाठी नोंद सातबाराला चढविण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना कलंबिस्त येथील तलाठ्याला आज रंगेहाथ पकडण्यात आले. मिलींद गजानन कुडतरकर (वय 50, रा. न्यू सबनिसवाडा) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयात लाच लुचपतच्या जिल्हा पथकाने केली. संशयितांकडुन जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. 

याबाबतची माहिती लाच लुचपत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर चिंदरकर यांनी दिली. ते म्हणाले, ""याबाबतची तक्रार कलंबिस्त येथील एका महिला लोकप्रतिनीधीने दिली होती. संबंधित तक्रारदार महिलेकडे कुडतरकर याने सातबारावर वारस नोंद करण्यासाठी तीन हजार रुपये मागितले होते. त्यातील दोन हजार रूपये यापुर्वीच स्वीकारले होते. आज उर्वरीत एक हजार रुपयाची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी दाखला देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे याबाबतची तक्रार संबंधित महिलेने लाचलुचपत विभागाकडे केली होती.'' 

या तक्रारीनुसार श्री. चिंदरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेवून आज सापळा रचला. एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात यश आले. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. 

मितेश केणी व श्री. फाले, श्री. गिरप, श्री. गवस, श्री. रेवंडकर, श्री. जळवी, श्री. परब, श्री. पेडणेकर, श्री. पोतनीस, श्री. पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणी कुडतरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. उद्या (ता.8) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे चिंदरकर यांनी सांगितले. 

सावंतवाडीील घरीही तपासणी 
श्री. कुडतरकर सावंतवाडी शहरात राहतात. या कारवाईनंतर त्याच्या न्यू सबनिसवाडा येथील घरीही तपासणी करण्यात आली, असे चिंदरकर यांच्याकडून सांगण्यात आले. 

Web Title: Sindhudurg News Kalabist Talathi arrested