कालावल खाडी - लाल फितीचा फास

कालावल खाडी - लाल फितीचा फास

कालावल खाडीपात्रालगत निसर्गनिर्मित मसुरकर जुवा, खोत जुवा, सावंत जुवा, परुळेकर जुवा ही बेटे पर्यटकांसाठी आकर्षण आहेत; मात्र कालावल खाडीपात्रात सक्‍शनद्वारे प्रचंड वाळू उपसा व त्यामुळे बदलणारा पाण्याचा प्रवाह, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरपरिस्थिती यांसारख्या समस्यांमुळे या बेटांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर बेटांच्या सुरक्षिततेसाठी धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर झाले खरे मात्र लालफितीच्या कारभारात या बंधाऱ्यांची कामे अडकली आहेत. या बेटांचे आणि पर्यायाने त्यावर राहणाऱ्या लोकांचे अस्तित्व धोक्‍यात आले असताना यावर मंजूर उपायांना लाल फितीचा फास लावला जात आहे. यातला विरोधाभास म्हणजे या बेटांवरील पर्यावरण वाचवण्यासाठी मंजूर उपायांनाच पर्यावरणाच्या निकषांचा अडसर केला जात आहे. या बेटांची व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न.

निसर्गसंपन्न दुनिया
तालुक्‍यातील भगवंतगड आणि भरतगड किल्ल्यामध्ये गडनदीचे कालावल खाडीपात्र आहे. या पात्रालगतच मसुरकर जुवा, सावंत जुवा, खोत जुवा, परुळेकर जुवा अशी निसर्गनिर्मित बेटे आहेत. यातील मसुरकर जुवा बेट हे ऐतिहासिक आहे. या बेटावर तीन पिढ्यांहून अधिक काळ मसुरकर कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. या बेटालगत असलेल्या खोत जुवा बेटावरही मोठ्या प्रमाणात मनुष्यवस्ती आहे. या दोन्ही बेटांवर माड बागायतीही मोठी आहे. परुळेकर व सावंत जुवा बेटांवर केवळ माड बागायती आहे. चहूबाजूंनी पाणी असलेली ही बेटे पर्यटकांसाठी आकर्षण आहेत. मसुरकर जुवा बेट ऐतिहासिक बेट म्हणून ओळखले जाते. या बेटावर चिंदर तेरई येथून होडीने तसेच मसुरे कावावाडी येथूनही जाता येते. या बेटावर दर तीन वर्षांनी होणाऱ्या भवानी मातेच्या गोंधळास हजारो भाविक उपस्थिती दर्शवितात.

भीतीची छाया
जुवा बेटाचा घेर ९०० मीटर आहे, तर खोत जुवा बेटाचा घेर सर्वसाधारणपणे अडीच किलोमीटर एवढा आहे. या दोन्ही बेटांवर २५० हून अधिक लोकवस्ती आहे. यातील मसुरकर जुवा बेटावर सध्या तीन कुटुंबे वास्तव्यास आहेत, तर खोत जुवा बेटावर तीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. या दोन्ही बेटांवरील माड बागायती हेच तेथील लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. गेली तीन ते चार पिढ्या या बेटांवर लोकांचे वास्तव्य आहे. दरवर्षी पावसाळ्यात या बेटांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यात गडनदीच्या पुराचा जास्त फटका हा मसुरकर जुवा बेटास बसत असल्याचे दिसून आले आहे. पुराचे पाणी मसुरकर जुवा बेटात घुसत असल्याने आतापर्यंत चार ते पाच घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अन्य रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत धरूनच बेटांवर वास्तव्य करावे लागते. त्यामुळे या बेटांच्या सुरक्षिततेसाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे गरजेचे बनले आहे.  
वाळू उपशाचा फास
कालावल खाडीपात्रात २००९ मध्ये वाळू उपसा करण्याचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदाराने सक्‍शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुरवात केल्याने या बेटांची मोठ्या प्रमाणात धूप होण्यास सुरवात झाली. कालावल खाडीपात्रात ज्या ठिकाणी वाळू उपसा करायचा होता त्याठिकाणाऐवजी मसुरकर बेटालगतच वाळू उपसा केल्याने मसुरकर बेटाची मोठी धूप झाली. खाडीतील बदलत्या पाण्याच्या प्रवाहामुळे माड बागायती मोठ्या प्रमाणात गिळंकृत होऊ लागली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अनिल मसुरकर, पंढरीनाथ मसुरकर यांच्यासह अन्य मसुरकर कुटुंबीयांनी याप्रश्‍नी प्रशासन, शासनाचे लक्ष वेधले. वाळू उपसामुळे मसुरकर जुवा बेटाची धूप होऊन लोकवस्तीस धोका निर्माण झाल्याने या ठिकाणी तत्काळ आवश्‍यक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांनी आवाज उठविला. 

बंधाऱ्यासाठी संघर्ष
कालावल खाडीपात्रात सक्‍शन मशीनचा वापर करून वाळू उपसा होत असल्याने मसुरकर, जुवा, खोत जुवा तसेच लगतच्या अन्य बेटांनाही धोका पोचत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठांपर्यंत पोचविली. सक्‍शन पद्धतीने होणारा वाळू उपसा हा धोकादायक असल्याने शासनाने सक्‍शन पद्धत बंद करून हातपाटी पद्धतीने वाळू उपसा करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गेली तीन वर्षे कालावल खाडीपात्रात हातपाटी पद्धतीने वाळू उपसा केला जात आहे. मसुरकर जुवा बेटालगत सध्या वाळू उपसा होत नसला तरी खाडीपात्रातील बदलत्या पाण्याच्या प्रवाहामुळे बेटालगतची माड बागायती खाडीपात्रात कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी याप्रश्‍नी शासनाचे लक्ष वेधून याठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे आवश्‍यक असल्याची मागणी केली. या बेटाबरोबरच खोत जुवा येथेही धूप प्रतिबंधक बंधारा घालण्याची मागणी करण्यात आली.

मसुरकर जुवा, खोत जुवा या दोन बेटांची होणारी धूप लक्षात घेता या बेटांचे अस्तित्व धोक्‍यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री, खासदार अरविंद सावंत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांचे निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन लक्ष वेधले. गेली काही वर्षे या बंधाऱ्याच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मसुरकर जुवा व खोत जुवा येथे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली.

मंजुरी नंतरही निराशा
जुवा बेटाच्या बंधाऱ्यासाठी १ कोटी २६ लाख २४ हजार ९१९ रुपयांची निविदा तर खोत जुवा येथील बंधाऱ्याच्या १ कोटी २६ लाख ९१ हजार २९१ रुपयांच्या निविदेस मान्यता देण्यात आली. धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची कामे मंजूर झाल्याने या दोन्ही बेटांवरील स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते; मात्र बऱ्याच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आणि पावसाळा जवळ आला असतानाही प्रत्यक्षात या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांना सुरवात न झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. बंधारा मंजूर झाल्यानंतर झालेले ग्रामस्थांचे समाधान कमी होऊन त्यांच्यात निराशा पसरली आहे. 

पर्यावरणचाच अडथळा
जुवा, खोत जुवा या बेटांच्या सुरक्षिततेसाठी बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली तसेच या कामांचा ठेकाही देण्यात आला असताना ही कामे का रखडली असा प्रश्‍न स्थानिक रहिवाशांना पडला आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या बंधाऱ्यांची कामे मार्गी लागणे आवश्‍यक असताना पर्यावरण विभागाच्या दाखल्याअभावीच ही कामे रखडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित खात्याने बंधाऱ्यांच्या कामांसाठी आवश्‍यक कार्यवाही पूर्ण करताना ही कामे करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

क्षमता आहे पण...
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या बेटांचा विकास होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या बेटांवरील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. ही बेटे पर्यटन केंद्रे ठरू शकतात. त्यामुळे याठिकाणी हॉटेल व्यवसाय तसेच अन्य सुविधांसाठी शासनाने काही अटींमध्ये शिथिलता देणे गरजेचे आहे. जेणेकरून स्थानिकांना आपली आर्थिक उन्नती साधता येऊ शकेल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बेटांचा विकास साधण्यासाठी शासनानेच सुविधा तसेच ध्येय धोरणे आखून द्यावीत, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. 

राज्यकर्त्यांचा कानाडोळा
आवश्‍यक परवानग्या लालफितीत अडकल्याने येत्या काळात धूप प्रतिबंधक बंधाऱ्याअभावी या बेटांना धोका निर्माण झाला आहे. पूरपरिस्थितीत मनुष्यहानी तसेच वित्तहानीही होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या बंधाऱ्यांच्या कामांसंदर्भात स्थानिक आमदार, पालकमंत्री यांचेही लक्ष वेधले; मात्र त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिला नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. बेटांचे अस्तित्व टिकविण्यासाठी राज्यकर्ते आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कालावल खाडीपात्रात चुकीच्या ठिकाणी सक्‍शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरू झाल्यापासूनच मसुरकर जुवा बेटाची मोठ्या प्रमाणात धूप होण्यास सुरवात झाली. अनेक वर्षे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आता मंजुरीनंतर बंधाऱ्यांची कामे का रखडली, असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. आवश्‍यक परवानग्यांची पूर्तता संबंधित विभागाने करताना तत्काळ बंधाऱ्यांची कामे मार्गी लावायला हवीत. कालावल खाडीपात्रात जर वाळू उत्खननातून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळत असेल, तर या बेटाच्या सुरक्षिततेसाठीही शासनाने आवश्‍यक त्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. आमचा अधिकृत वाळू उपशाला विरोध नाही; मात्र बेटांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तत्काळ पावले उचलायला हवीत. या बंधाऱ्यांच्या कामांबरोबरच पर्यटन दृष्टिकोनातून या बेटांचा कसा विकास साधला जाईल यादृष्टीनेही आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शासनाकडून व्हायला हवी. 
- अनिल मसुरकर,
स्थानिक रहिवासी

मसुरकर जुवा, खोत जुवा बेटाची माती ही मृदूमाती या प्रकारात मोडते. कालावल खाडीपात्रातील वाळू उपसामुळे या दोन्ही बेटांची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतरही कामांना प्रत्यक्षात सुरवात झालेली नाही. ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या आम्ही जाणत नाही. आम्हाला बंधाऱ्यांची कामे तत्काळ व्हायला हवीत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असताना तो खर्ची का घातला जात नाही, असा प्रश्‍न पडला आहे. या ठिकाणी होणाऱ्या वाळू उपसातून शासनाला प्रचंड महसूल मिळतो मग हा पैसा या बेटांच्या सुरक्षिततेसाठी का वापरला जात नाही, असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. शासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. बेटाची होणारी धूप व पूरपरिस्थितीपासून आमचे संरक्षण करण्यासाठी लालफितीत अडकलेल्या या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे तत्काळ मार्गी लावावीत.
-पंढरीनाथ मसुरकर,
स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com